सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील विजेच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावा ; नितीन राऊत यांचे निर्देश
सिल्लोड (विवेक महाजन) सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले.
मंत्रालयातील ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या दालनात बुधवार (दि.9) रोजी मंत्री नितीन राऊत तसेच महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची बैठक संपन्न झाली. यावेळी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाअंतर्गत शेतकऱ्यांच्या वीज समस्या व विविध कामांच्या संदर्भात आढावा घेवून याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ऊर्जा मंत्री डॉ. राऊत बोलत होते .
महावितरणच्या स्वतंत्र सिल्लोड विभागाची निर्मिती झाल्यामुळे ग्राहक सेवेत झालेल्या सुधारणेबाबत मंत्री राऊत व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी समाधान व्यक्त केले. सिल्लोड सोयगाव तालुक्यात कृषी पंपाच्या रोहितत्रांची क्षमतेत वाढ करावी, नवीन रोहित्र बसवावेत , शेतकऱ्यांना जळालेली रोहित्र २४ तासाच्या आत मिळावे यासाठी सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यासाठी प्रत्येकी किमान ५० रोहित्र अधिकचे असावे, तसेच जीर्ण झालेल्या तारा बदलण्याची मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली. यावर उपलब्ध निधीतून ही कामे त्वरित करण्यात यावी तसेच वाढीव निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश डॉक्टर नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले .
राज्य शासनाच्या कृषी वीज धोरणानुसार कृषी पंपाच्या वीजबिल वसुलीतील ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत स्तरावरच विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात कृषीपंपाचे वीजबिल भरण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे . कृषीपंपाच्या प्रलंबित जोडण्या तातडीने द्याव्यात असे निर्देशही ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले.
या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे , संचालक संजय ताकसांडे, संचालक डॉक्टर नरेश गीते, मराविमं कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे आदींची उपस्थिती होती.