रणरणत्या उन्हात न्याय व हक्कासाठी बोरशेतीचे ओबीसी नागरिक एकवटले
मुंबई : ट्रिपल टेस्ट आणि इम्पेरिकल डाटा यामुळे ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळण्यात अडचण होत आहे. त्यामुळे जोपर्यंत ओबीसींची जातिनिहाय जनगणना होऊन आरक्षण व हक्काची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्याला लढाई लढावीच लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते व ओबीसी प्रणेते छगन भुजबळ यांनी पालघर येथे केले.

ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून पालघर येथे ओबीसी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने पालघर व ठाणे जिल्ह्यातील ओबीसी बांधव एकवटले होते. जातनिहाय जनगणना, राजकीय आरक्षण, नोकर भरती, जिल्हा तेथे वस्तीगृह, ओबीसी विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती, पदोन्नती, ओबीसी मंत्रालय आदी विविध मुद्दे व मागण्यांसाठी या मोर्चाच्या माध्यमातून आक्रोश तथा मागणी रेटून धरण्यात आली.

ट्रिपल टेस्ट पूर्ण झालेली नाही तर त्यातच इम्पेरिकल डाटा मध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनो यासाठी आपल्याला लढा सुरुच ठेवावा लागेल असे भुजबळ यांनी म्हटले. तर ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने दिले.

या मोर्चासाठी ओबीसी संघर्ष समितीध्यक्ष तथा माजी महापौर राजू पाटील, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वय भालचंद्र ठाकरे, सल्लागार डि.के.संख्ये, कुंदन संख्ये आदी पदाधिकारी यांनी यशस्वी पणे मोर्चाचे नियोजन केले होते. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी भांगरथ, ओबीसी महासंघ कोकण विभागीय अध्यक्ष एकनाथ तारमळे तसेच बोरशेती चे राणा स्पोर्ट्स अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम अक्रोश मोर्चासाठी उपस्थित होते.




