बोरद येथे ग्रामसभा संपन्न
बोरद (योगेश गोसावी) कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉक डाऊन असल्याने दोन वर्षात प्रथमच ग्रामसभा प्रशासक बी.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रथम ग्राम विस्तार अधिकारी विजय पाटील यांनी ‘ड’ यादीचे वाचन केले.त्यात एस.टी ६११ व एस.सी. १२२ व इतर समाजाचे ४०० असे एकूण ११३३ नावाचे वाचन केले. त्यात त्यांनी सांगितले की ज्यांनी २००१ पासून आज तागायत पंतप्रधान योजना, इंदिरा गांधी योजना ,शबरी योजना व रमाई योजनेअंतर्गत घरकुल घेतले असेल किंवा एकाच कुटुंबातील पतीने किंवा पत्नीने लाभ घेतला असेल तर त्यापैकी कोणी एकाचे नाव आले असेल त्यांचे नाव रद्द करण्यात येईल असे सांगून ठराव मंजूर करण्यात आला. नंतर २०२१,२०२२ साठी रमाई साठी ४८प्रस्ताव होते. त्यापैकी १८ प्रस्ताव जमा झाले तसेच शबरी योजनेअंतर्गत १८ टार्गेट होते त्यापैकी ९ प्रस्ताव आले व मंजूर करून नाव वाचून मंजुरी देण्यात आली.
जल जीवन मिशन अंतर्गत तळोदा तालुक्यातील बोरद गावाची निवड केंद्र शासनाने केली त्यात लोकवर्गणी ५.८ टक्के गोळा करून भरावे लागतील. तो ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. जि.प. क्रीडा विभागातर्फे गावात व्यायाम शाळेसाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले. गावांतर्गत गटारी, काँक्रिटीकरण महिला व पुरुषांसाठी शौचालय बांधणे, रस्ते आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. तालुक्यात सर्वात जास्त दलित वस्तीत ५५९ लोकसंख्या असल्याने ५० लाखांचे सर्व सोईयुक्त सुविधा भवन मंजूर झाले आहे. त्या भवनाला एकमताने मंजुरी देण्यात आली. जि. प. शाळा नंबर २ इमारतीची दुरुस्ती ची मंजुरी देण्यात आली. ग्रामपंचायत फेरफार आकारणीस मंजुरी देण्यात आली. नंतर आयत्यावेळी बियरबार साठी ३ अर्ज आले होते त्यात उपस्थितांचा विरोध लक्षात घेता त्या अर्जावर विचार न करता स्थगिती देण्यात आली. महिला ग्रामसभा घेऊन निर्णय घेऊ असे सांगून विषय टांगणीला ठेवण्यात आला.
यावेळी काँ. मंगलसिंग चव्हाण व कॉ. दयानंद चव्हाण यांनी त्यांच्या घराच्या ८ नंबर वर सरकार लिहिले आहे तो सरकार शब्द काढून मालकाचे नाव लिहावे. अशी मागणी केली असता ती एकमताने मंजूर करण्यात आली. व तीन महिन्यात ज्यांच्या घराचा नंबर ८ वर सरकार शब्द लिहिला आहे त्या ८ नंबर वर स्वतः मालकाचे नाव लिहिले जाईल असे आश्वासन प्रशासक बी.के. पाटील व ग्राम विस्तार अधिकारी विजय पाटील यांनी दिले तसेच विद्युत मंडळाच्या कार्यालयाला २५ वर्षापासून ग्रामपंचायतीने गावठाण जागा दिलेली आहे त्याचे कर व बिल विद्युत मंडळाकडे बाकी आहे ते बिल मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल तो ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शेवटी प्रशासक बी.के. पाटील यांनी ‘ड’ यादीत ज्यांचे नाव आलेले आहेत व त्यांनी यापूर्वी घरकुल घेतले असेल त्यांचे नाव वगळण्यात येतील असे सांगून ग्रामसभा संपली असे जाहीर करण्यात आले.
शेवटी उपस्थितांचे आभार विजय पाटील यांनी मानले यावेळी प.स. सदस्य विजय राणा, माजी सरपंच वासंती ठाकरे, माजी जि. प. सदस्य नरहर ठाकरे माजी उपसरपंच रंजनकोर राजपूत माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, मंगलसिंग चव्हाण, कन्हैयालाल ढोडरे, भावराव बिरारे, रविन्द्र वरसाळे, इस्माईल तेली, आत्माराम रहासे, युवराज ठाकरे, दयानंद चव्हाण, आकूसिंग पवार, जयसिंग पवार, गौतम भिलाव, रवींद्र भिलाव, विजय ठाकरे, इत्यादी सह असंख्य नागरिक उपस्थित होते.प्रथम ग्रामसभा सुरू होण्याअगोदर करोना काळात मृत्युमुखी पडलेल्या सर्व गावकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिस पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.