FYJC Admission : ११वीला प्रवेश घेण्यासाठी ‘या’ तारखेपासून सुरू होणार ऑनलाईन रजिस्ट्रेशन
मुंबई (वृत्तसंस्था) निकालाकडे लक्ष लागून असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Maharashtra Board SSC Result 2022) अकरावी प्रवेशाच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी 30 मे 22 पासून ऑनलाईन अर्जप्रकिया सुरू होणार आहे.
सध्या 10वीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी FYJC मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण असेल. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी सराव अर्ज भरण्याचा मॉक राउंड सोमवारपासून (23 मे 2022) सुरू झाला आहे आणि रविवार (29 मे 2022) पर्यंत तो सुरु राहणार आहे. विद्यार्थी 11thadmission.org.in या वेबसाईटवर लॉग इन करू शकतात. त्यानंतर ते प्रवेश घेऊ इच्छित असलेले शहर निवडू शकतात. या मॉक राउंड प्रक्रियेत उमेदवारांसाठी डेमो-लॉगिन प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल.
29 मे रोजी ही अर्ज भरण्याची प्रक्रिया संपेल आणि हा डेमो-लॉगिन डेटा नष्ट केला जाईल. त्यानंतर 30 मेपासून विद्यार्थी 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरू शकणार आहेत. ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्रातील काही निवडक शहरांमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा महाविद्यालयांची प्राधान्य यादी द्यावी लागेल. या प्राधान्य फॉर्ममध्ये किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची नावे भरता येतील. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल.
यावर्षी 11 वी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक उशिरा जाहीर केलं गेलं. यापूर्वी 17 मे रोजी मॉकराऊंड सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र तो स्थगित करण्यात आला होता आणि तो आता सोमरपासून (23 मे 2022) सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेतील पहिला फॉर्म 30 मे 22 पासून भरता येईल. तर 10वीच्या निकालानंतर फॉर्मचा दुसरा भाग भरता येईल.