विराट कोहलीने सोडलं कसोटी कर्णधारपद !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विराट कोहलीने टी २० आणि एकदिवसीय कर्णधारपदानंतर भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही महत्वाची माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये विराट कोहलीने रवी शास्त्री आणि धोनी यांचे आभार व्यक्त केले आहेत.
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे त्याने ही कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विराटऐवजी केएल राहुलला या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बनवण्यात आले. पण विराटची अनुपस्थिती भारताला महागात पडली आणि त्यांनी हा सामना गमावला. आता विराटनंतर कोणाकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाची कमान सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काल शनिवारी संध्याकाळी विराटने ट्विटरवरून कसोटी कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. एक संदेश देताना त्याने संघाच्या कर्णधारपदाची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले. कोहलीने लिहिले, “सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा १२० टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.”
३३ वर्षीय विराट कोहलीने २०१४ मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ९९ सामने खेळले असून ७९६२ धावा केल्या आहेत. यातील ६८ सामन्यांमध्ये विराटने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आणि या कालावधीत एकूण ५८६४ धावा केल्या.