अमरावतीत शिवसृष्टी, चिखलदरा स्काय वॉकसह विविध स्थळांच्या विकासासाठी निधीसाठी पर्यटन मंत्र्यांची सकारात्मकता
पर्यटनदृष्ट्या अमरावती जिल्हा होणार विकसित - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती (प्रतिनिधी) अमरावती शहरातील शिवटेकडी येथील नियोजित शिवसृष्टी, वडाळी तलाव विकास व सुशोभीकरण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान, तसेच श्री क्षेत्र कौंडण्यपूर, चिखलदरा येथील स्काय वॉक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या विविध महत्वपूर्ण स्थळांच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शवली असून, अमरावती जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यास चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.
अमरावती शहरातील नियोजित शिवसृष्टी व विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मिळण्याबाबत पालकमंत्र्यांनी आज पर्यटन मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. आमदार बळवंतराव वानखडे, महापालिका गटनेता दिनेश बूब आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी व पर्यावरणविषयक बाबींसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा यावेळी करण्यात आली.
अमरावती शहरातील शिवटेकडी, वडाळी तलाव यांचा विकास व सुशोभीकरण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान, तसेच जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर, केकतपूर, शेवती, संगमेश्वर आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यासाठी पर्यटनमंत्री ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शवली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विकास आराखडा, संत गाडगेबाबा विकास आराखड्यातील उर्वरित कामांना चालना मिळण्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार ही कामे लवकरच पूर्णत्वास जातील व अमरावती जिल्ह्यात पर्यटनाबाबत विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
शिवटेकडीवर साकारणार शिवसृष्टी
शहराच्या मध्यवस्तीत शिवटेकडी असून त्याठिकाणी शिवसृष्टीची उभारणी करण्याबाबत नियोजित आहे. त्याबाबत तीन कोटी रूपये निधीची मान्यता प्राप्त आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३० लाख निधी प्राप्त झाला. तसेच उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान
वडाळी येथे ब्रिटीशकालीन तलाव असून, त्याठिकाणी उद्यानही विकसित आहे. लगतच बांबू गार्डन हे पर्यटनस्थळ विकसित आहे. एस.आर.पी.कॅम्प, वनविभाग व महापालिका यांच्या जमिनी व नैसर्गिक संसाधने परिपूर्ण असलेले दोन तलाव व नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या भूभागावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी निधी मिळवून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली. आवश्यक तो सर्व निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली. चिखलदरा येथील स्काय वॉकच्या कामासाठीही तत्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल. हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. चिखलदरा येथे महत्वपूर्ण सुविधा याद्वारे निर्माण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांचे संवर्धन, सौंदर्यीकरण करून पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. अमरावती जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून, अनेक कामांना निधी मिळवून देण्याबाबत पर्यटन मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविल्यामुळे लवकरच ही कामे गती घेतील. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली.