सावळा, भादोला व किन्होळ्यातील पथदिव्यांची समस्या निकाली !
रविकांत तुपकरांच्या प्रयत्नांमुळे दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर
मोताळा (सभांजी गवळी) ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वीजेच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्या निकाली निघाव्या यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर सातत्याने प्रयत्नरत असतात. दरम्यान त्यांच्या प्रयत्नांमुळे भादोला, सावळा आणि किन्होळा या तीन गावांमध्ये वीज समस्या दूर करण्यासह पथदिव्यांची समस्या निकाली काढण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री ना. डॉ. शिंगणे यांच्या आदेशान्वये जिल्हा नियोजन समितीतून हा निधी मजूर करण्यात आला आहे.
चिखली तालुक्याती वळती, सोमठाणा, दिवठाणा यासह सहा गावांतील शेतकऱ्यांना आणि पोल्टीफार्म धारक शेतकऱ्यांना दिवसरात्र वीजपुरवठा मिळावा म्हणून विशेष तरतूद आणि निधी उपलब्ध करुन देण्याचे काम रविकांत तुपकर यांनी केले आहे, त्यामुळे या गावातील पोल्ट्रीधारक तसेच इतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच सावळा येथे विद्युत अपघात टाळण्याच्या अनुषंगाने एबी केबल टाकण्याच्या कामास मंजुरी मिळाली असून यासाठी ४ लाख ४० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. किन्होळा येथे पथदिव्यांसाठी ३ फेज ४ वायर व ३ फेज ५ वायरमध्ये रुपांतर करण्यासाठी १ लाख २४ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भादोला येथे १ फेज २ वायरचे १ फेज ३ वायर मध्ये रुपांतर करुन पथदिव्यांकरिता वीज जोडणी देण्याच्या कामासाठी दीड लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. रविकांत तुपकर यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सदर कामास प्रशासकीय मान्यता देण्यासह निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे या तिनही गावातील वीज समस्या दूर होण्यासह पथदिव्यांचा प्रश्नही निकाली निघणार आहे.