सोयगाव ( विवेक महाजन प्रतिनिधी ) दि.30, शिवसेना निरीक्षक व पदाधिकाऱ्यांनी सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सोयगाव येथील महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या मुलाखतीमध्ये यंदाची निवडणूक लढविण्याची तयारी असणार्या आजी-माजी नगरसेवकांसह नव्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.
शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्या उमेदवारांसाठी मंगळवारी ( दि.30 ) सोयगाव येथील सेना भवन कार्यालयात मुलाखती ठेवल्या होत्या. दुपारी 1 वाजेपासून मुलाखती सुरू झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाखती सुरु होत्या. इच्छुकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, निरीक्षक सुदर्शन अग्रवाल, तालुका संघटक दिलीप मचे, नंदकिशोर सहारे, रईस मुजावर, राजू गौर, दत्ता भवर, मोईन पठाण, मुश्ताक देशमुख यांच्यासमोर मुलाखती दिल्या आहे. मुलाखत देऊन ज्याने त्याने आपली उमेदवारी बळकट करण्यासाठी आपण काय करणार किंवा आपण योग्य उमेदवार कसे ठरू शकतो याबाबतचा खुलासा केला.
मुलाखतीच्या कालावधी दरम्यान संपर्क कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती. सोयगाव नगर पंचायतीच्या 17 जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.