अलिशान जीवन जगण्यासाठी करत होता घरफोड्या ; टिकटॉक स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कुर्ला : अलिशान जीवन जगण्यासाठी घरफोडी करणाऱ्या एका टिकटॉक स्टारला विनोबा भावे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिमन्यू गुप्ता असं या टिकटॉक स्टारचं नाव असून अलिशान आयुष्य जगण्यासाठी तो घरफोडी करत होता.
अभिमन्यू हा समाज माध्यमावर खूपच प्रसिद्ध आहे. प्रसिद्धी मिळवण्याबरोबरच त्याला अलिशान जीवन जगण्याचा शौक होता. गेल्या 18 मे रोजी कुर्ल्यातील ख्रिश्चन गाव येथील एका घराला कुलूप असल्याचे पाहून त्याने चोरी केली होती. यावेळी घरातून 279 ग्रॅम सोने आणि जवळपास दीड तोळे चांदीवर अभिमन्यू याने डल्ला मारला होता. या चोरीबाबत घर मालक मीरा सिमरेय्या यांनी विनोबा भावे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. यावर वरिष्ठ पोलोस निरीक्षक राजीव चव्हाण यांनी एक पथक तयार करून चौकशी सुरू केली. तसेच तांत्रिक बाबी तपासून अभिमन्यू गुप्ता याची माहिती मिळवली.
दरम्यान, खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी अभिमन्यू यास अटक केली. पोलिस चौकशीत त्याने यापूर्वी मुंबई,ठाणे,वसई विरार या ठिकाणीही घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टिकटॉक तसेच इतर समाज माध्यमात प्रसिद्ध आहे. त्याचे लाखो फॉलोअर्सवर असून फक्त आलिशान जीवन व्यथित करण्यासाठी हे काम करत असल्याचे आरोपीने सांगितले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी अभिमन्यू याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, 14 मोबाईल तसेच 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले.