धुळे जिल्ह्यात सप्टेंबरच्या अतिवृष्टीतील बाधित शेतकऱ्यांना भरपाई वाटपाचे आदेश : आ. कुणाल पाटील
धुळे (करण ठाकरे) सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होते नुकसान झालेल्या शेतकर्यांसाठी भरपाई मिळावी म्हणून पाठपुरावा करीत आ. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील बाधित शेतकर्यांना २९ कोटी २१ लक्ष ८० हजार रुपये वाटप करण्याचे आदेश प्राप्त झाले असून सदर नुकसान भरपाई लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धुळे जिल्हयासह धुळे तालुक्यात ५ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२१ रोजीअतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. झालेल्या नुकसानीची आ. कुणाल पाटील यांनी तातडीने दखल घेत पहाणी केली आणि तत्काळ पंचनामा करुन नुकसानींचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान धुळे तालुक्यातीलजास्तीत जास्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आ. कुणाल पाटील यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांची भेट घेवून आ. पाटील यांनी मदतीची मागणीही केली होती. शासनाने मदत जाहिर करुन नुकसान भरपाईसाठी निधी मिळावा म्हणून आ. कुणाल पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार धुळे तालुक्यातील एकूण ४७ हजार २२७ शेतकर्यांना २९ कोटी २१ लक्ष ८० हजार रुपये मदत निधी प्राप्त झाला असून सदर निधी बाधित शेतकर्यांना तत्काळ वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या असल्याची माहिती आ. कुणाल पाटील यांनी दिली आहे.