रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज
धुळे (करण ठाकरे) स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख खास आपल्यासाठी…. इ.स. १६०० च्या आसपासचा काळ, या काळात देशात व महाराष्ट्रात सर्वत्र अराजकता माजली होती. लढाया आणि कत्तली यांनी तर उच्छाद मांडला होता. हजारो लोकांना गुलाम बनविणे, मंदिरांचा विध्वंस करणे, स्त्रियांना भ्रष्ट करणे, जिझीया नावाचा जुलमी कर जबरदस्तीने वसूल केला जात होता. यातच दुष्काळाचे तांडवनृत्य सुरू होते. सगळीकडे अनिश्चितता आणि अराजकता माजली होती. अशातच ( विश्वसनीय साधनांच्या आधारे व इतिहास संशोधक आणि महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या तिथीनुसार) फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० रोजी मराठवाड्यातील वतनदार भोसले घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजीराजे व सिंदखेडच्या जाधव घराण्यातील कन्या जिजाऊ या दाम्पत्याच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुरातन दंतकथेनुसार जिजाबाईनी शिवाई देवी ला आपल्याला एक बलवान पुत्र व्हावा अशी इच्छा मागितली होती. त्यानुसारशिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवण्यात आले असावे असे मानले जाते.
शहाजीराजे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते. त्यामुळे पित्याचे मार्गदर्शन व खंबीर साथ, कठोर शिस्तीचा गुरु आणि माता जिजाऊंच्या संस्कारातून “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” हा मिळालेला मंत्र आणि साधू-संतांकडून धर्म व राष्ट्रभावना जागृत करण्याची मिळालेली शिकवण सोबत ठेऊन महाराष्ट्रातील बहुजन मराठा मावळ्यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
दादोजी कोंडदेवांच्या मृत्यू नंतर स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराजांवर येऊन ठेपली होती. त्यामुळे अशातच आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २००० सैनिकांच्या छोट्या तुकडी पासून ते एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी व अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक नव्या किल्ल्यांची उभारणी केली. सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा, शिस्तबद्ध लष्कर आश्चर्यजनक बेगवान हालचाली, बलाढ्य शत्रूचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे नेमके हल्ले व गनिमी काव्याच्या तंत्राचा योग्य वेळी वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रागतिक अशा हिंदवी स्वराज्याची यशस्वी पणे उभारणी केली. राज्यकारभारात मराठी भाषेच्या वापराला प्रोत्साहन दिले. महाराजांना स्वभाषेचा अभिमान होता. त्यांनी रघुनाथ पंडिताकरवी राज्य व्यवहार कोश ची निर्मिती केली. अरबी, फारसी भाषेच्या गुलामगिरीतुन मराठी भाषेची सुटका करण्यासाठी अटोकाट प्रयत्नइतिहासकार म्हणतो “कुटनीतीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितकं होतं तितकं औरंगजेबाच्या पूर्ण शरीरात नव्हतं. आदिलशाहीच्या तावडीतून शहाजी राजांच्या सुटकेसाठी केलेले राजकारण, जयसिंगांसी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देऊन २९ ऐवजी प्रत्यक्षात १७ किल्ले देण्याचे राजकारण, अफजलखानाला मैदानी प्रदेश सोडून प्रतापगडाच्या पायथ्याशी दूर्गम, जंगली, पर्वतीय प्रदेशात आणण्याची केली गेलेली कूटनीती, अछयाहून सुटका करून घेण्यासाठी आजारी पडण्याचे केलेले नटक, औरंगजेबाने कर लागू केल्यावर तुमच्यावर इतके दारिद्र्य आले आहे का? अशा आशयाचे त्याला हीणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी काही उत्तम उदाहरणे आहेत. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे सांगणारे शिवाजी महाराज शेती सुधारणांच्या बाबतीत अग्रणी होते. नापीक जमीन, उपजाऊ जमीन, पीक, गावकरी आणि शेतकरी यांना संपूर्ण संरक्षण देणारे, उत्तम आणि शास्त्रशुद्ध जमिनीची मोजणी करणारे, संकटकाळात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकर्यांना शेतसारा माफ कर माफ, कर्ज माफ करून आगाऊ मदत देणारे होते. एवढंच काय तर महाराजांनी परस्त्रीला मातेसमान मानीत साडी चोळीची बोळवण करीत. कोणत्याही जाती धर्माच्या स्त्रिला धक्काही न लावण्याचे सक्त आदेश दिले होते. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तम प्रशासन, राज्यकारभाराच कौशल्य, सर्वधर्मसमभाव, अष्टप्रधान
मंडळ, बळकट चलन व्यवस्था वगुणवत्ता या सर्वातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविधांगी गुणांचे दर्शन घडते. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करतांना अशा या रयतेचा वाली असलेले, थोर राजे छत्रपती शिवाजी महाराज दि. ३ एप्रिल १६८० रोजी स्वर्गवासी झाले. अशा राजा बिना पोरकी असलेली जनता आजही आपल्या राजाच्या शोधात आहे. आपल्या या राजाचे वरील गुण घेऊन महाराष्ट्रीयन व भारतीय समाज विकासाची वाटचाल करत आहे… करत राहील..
आज देशात व राज्यात विविध समस्या 3 आहेत, जयंतीच्या निमित्ताने त्या समस्या सोडविण्यासाठी सत्ताधारी व राजकारण्यांनी आणि समाजातील प्रत्येक घटकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वरील विचारांचा अंगिकार करायला हवा. बुध्दी कौशल्यांचा वापर करून राज्य व राष्ट्र निर्माणात योगदान द्यायला हवे. नि आपल्या ह्याच कामातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना केलेले अभिवादन जनतेच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम…