सदावर्तेंचा पाय आणखी खोलात..!
मुंबई/सातारा : मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत हल्ला केला. यात कर्मचाऱ्यांचे (lawyer) वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत ठाण मांडुन आहेत. न्यायालयीन आदेशानुसार सदावर्ते यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात झाली. येथून सदावर्ते यांना सातारा पोलिस गुरुवारी ताब्यात घेतील असे सांगण्यात येत आहे. ॲड. सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यातही एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आज सातारा पोलिसांना सदावर्ते यांचा ताबा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्लाप्रकरणी (lawyer) ॲड. गुणरत्न सदावर्ते सध्या संशयित आरोपी म्हणून मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. अकरा तारखेच्या सुनावणीमध्ये त्यांना आणखी दोन दिवस दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर काल त्यांची कोठडीची मुदत संपणार असल्याने त्यांना मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले होते. कालच्या सुनावणीमध्ये सदावर्ते यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदावर्ते यांच्यावरील सातारा पोलिसांतील गुन्हा…
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी एका वृत्तवाहिनीवर तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे ॲड. सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यातही एक गुन्हा दाखल आहे. दोन वर्षापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. सदावर्तेंना या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी सातारा शहरचे पोलिस निरिक्षक भगवान निंबाळकर व त्यांची टिम मुंबईत जाऊन ठाण मांडून बसली होती.
आता सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांचा ताबा सातारा पोलिसांनी मिळेल अशी शक्यता होती, मात्र तसे झाले नाही. सदावर्ते सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून त्यांचा ताबा घेण्यासाठी गेलेले सातारा पोलिस ताब्यासाठी न्यायालयीन आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.