…अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार : एकनाथ खडसे
बोरद (योगेश गोसावी) नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढण्यास प्राधान्य देणार असून यासाठी जागांची वाटणी सुयोग्य नियोजनपूर्वक करण्याच्या आग्रह राहणार असून तसे न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर देखील लढणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना दिले.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे हे शनिवारी तळोदा शहराजवळील बुहुरुपा येथे लग्न समारंभासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी तळोदा राष्ट्रवादी च्या शहरातील कार्यालयास भेट दिली होती. एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी कार्यालयाजवळ आले असता कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार करण्यात आले. त्यानंतर ते विश्रामगृहात आले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी जिल्ह्यातील डिसेंमबर मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांबद्दल पक्षाच्या भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढण्यास प्राधान्य देणार आहे. परंतु त्यासाठी जागांचे नियोजन सुयोग्यपणे करण्याची अपेक्षा आहे. तसे झाले नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहे. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते वेगवेगळे विधायक उपक्रम राबवून पक्ष संघटन ही मजबूत करीत आहे. याशिवाय शहादा व नंदुरबार विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी च्या आग्रह राहणार आहे. कारण यापूर्वीही या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादी लढली आहे. सहाजिकच राष्ट्रवादी चा हक्क आहे. त्याच बरोबर विधानपरिषदेतील प्रलंबित १२ आमदारांचा नियुक्ती चा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचा आशावाद त्यांनी बोलून दाखविला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ.उदेसिंग पाडवी, डॉ.तुषार संनसे, डॉ.रामराव आघाडे, शहराध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, डॉ. पुंडलिक राजपूत,उपस्थित होते.
पाच कोटीचा निधी मिळेलच
तळोदा शहरातील नवीन वसहतींमधील विकास कामांसाठी पाच कोटींचा प्रस्ताव एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून राज्यसरकारकडे दाखल केला आहे. याबाबत त्यांनी सांगीतले की, सदर प्रस्तावाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी प्रत्यक्ष पाठपुरावा केला असून त्यांनी निधी देण्याबाबत ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा निधी नवीन वसाहत धारकांना मिळणारच असून यात कुठलीही शंका कुशंका घेऊ नका असे ही त्यांनी ठासून सांगितले दरम्यान शहरापासून जवळ असलेल्या प्रसिद्ध रोकडमल हनुमान मंदिरास भेट देऊन त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी पुरोहित हरीश जोशी (महाराज) यांनी विधिवत मंत्रोउपचार केला. यावेळी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष आरीफ नुरा, शहराध्यक्ष आदिल शेख, नदीम बागवान, गणेश पाडवी, गणेश राणे, अनिल पवार, संघटक राहुल पाडवी, मुकेश पाडवी, हितेश राणे, पुरुषोत्तम चव्हाण यांसह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खडसेंच्या अचानक भेटीची उत्सुकता
राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी तळोदा शहरात अचानक भेट दिल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चलबीचल दिसून आली. त्यांनी पत्रकारांशी काय वार्तालाप केला याची उत्सुकताही पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून आली. काहींनी त्याबाबत विचारणा ही केली. माजी नगराध्यक्ष भरत माळी व शहादा येथील सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनीही त्यांची शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली.



