जळगाव जिल्हा

‘ऑनलाईन’नव्हे ‘ऑफलाईन’ शिक्षणाकडेच जाणार : उदय सामंत

जळगावात युवा सेनेतर्फे आयोजित युवा संवादावेळी स्पष्टोक्ती

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री असल्याने ठिकठिकाणच्या महाविद्यालयांत, विद्यापीठांत जाण्याचा योग येतच असतो. त्या अनुषंगाने ‘कोरोना’चे संकट आता बर्‍यापैकी दूर झाल्यानेे मी पुन्हा महाविद्यालयांत, विद्यापीठांत जातो तेव्हा तेथे परीक्षा रद्द करणारा मंत्री आलेला आहे, अशी माझी प्रसिद्धी झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र, मी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक अशा सर्वांनाच सांगू इच्छितो, की ‘ऑनलाईन’ शिक्षण पद्धती ही ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारने निवडलेला पर्याय होता. तो कायमस्वरूपी निवडलेला नाही. त्यामुळे यापुढे संपूर्ण शिक्षण पद्धतीत ‘ऑनलाईन’ नव्हे; तर ‘ऑफलाईन’कडेच जावे लागणार आहे. त्यामुळे संभ्रमावस्थेत राहण्याचे काहीही कारण नाही. तसेच ’ऑनलाईन’ पद्धतीतून उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यावर ‘कोविड’ बॅचचा विद्यार्थी म्हणून ठपका ठेवला जाणार नाही. तसेच येत्या दोन वर्षांनंतर ‘एमएच-सीईटी’ ही परीक्षा वर्षभरात एक नव्हे; तर दोन वेळा घेण्यात येईल. त्यात बारावीच्या अभ्यासक्रमाला 50 टक्के व एमएच-सीईटी परीक्षेसाठी 50 टक्के गुणांची विभागणी केली जाईल. म्हणजे बारावी 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालो, तरी चालते, ही मानसिकता दूर होऊन विद्यार्थ्यांचा कल अभ्यासाकडेच राहील, अशी स्पष्टोक्ती वजा घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना.उदय सामंत यांनी केली.

युवा सेनेतर्फे शनिवार, दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ‘युवा संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्नांवर ऊहापोह व्हावा, या उद्देशातून विद्यार्थ्यांच्या वतीने सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ (पुणे) यांच्याद्वारे मुलाखतीचे आयोजन केले गेले. त्यात गाडगीळ यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे देताना ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्येची देवता माँ सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पार्पण केले. त्यानंतर समस्त जळगावकरांच्या वतीने जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांचा, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील व विशाल वाणी, महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांचा युवा सेनेच्या पदाधिकारी वैष्णवी खैरनार, जया थोरात व यशस्वी वाघ, तर युवा सेनेचे विभागीय सचिव आविष्कार भुसे यांचा युवा सेनेचे पदाधिकारी शंतनू नारखेडे व अमित जगताप यांनी यथोचित सत्कार केला. तसेच कार्यक्रमाची मूळ संकल्पना राबविणारे युवा सेनेचे महाराष्ट्राचे सहसचिव विराज कावडिया यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांचा यथोचित सत्कार केला.

याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, पंकज राणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ.हर्षल माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, युवा सेना महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी यांच्यासह युवा सेनेचे सर्व कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राचार्य, संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विराज कावडिया यांनी प्रास्ताविकात युवा सेनेतर्फे युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका व उद्देश थोडक्यात सांगितला. यानंतर सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ (पुणे) यांनी थेट राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/नोकरी प्रशिक्षण इत्यादींसाठी जाणे आवश्यक आहे. परंतु ग्रामीण क्षेत्रात अशा सुविधा फारच कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारची काही योजना/ध्येय-धोरण आहे का? यावर मंत्री सामंत म्हणाले, की यासंदर्भात राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची प्रकर्षाने काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/नोकरी प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत पुरविण्यासंदर्भात विचार नक्कीच करू. गाडगीळ यांनी नवीन शिक्षण प्रणालीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता मंत्री ना. सामंत म्हणाले, की नवीन शिक्षणप्रणाली पाच-सहा महिन्यांपूर्वीच केंद्राकडून लागू झालेली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी डॉ. माशेलकरांना या शिक्षण पद्धती अंमलबजावणी समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यासह तीन टप्प्यांत या शिक्षणप्रणालीची विभागणी केली. त्यात अभ्यासक्रमात क्रांतिकारी बदल करायला हवेत, ग्रामीण भागाला यात न्याय मिळावा, तसेच यासाठी मोठी आर्थिक तरतूदही करावी. राज्य सरकारने पहिली टीचर्स अ‍ॅकॅडमी पुण्यात सुरू केली असून, इन्फोसिस कंपनीला हे काम दिले आहे. त्यांच्याद्वारे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही विविध प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांनीही सकारात्मकता दाखविणे गरजेचे आहे.

गाडगीळ यांनी राज्यातील मूल्यशिक्षणासंदर्भातील धोरणाबाबत प्रश्न विचारला असता मंत्री ना. सामंत म्हणाले, की महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालकांचा मूल्यशिक्षणाचे विविध अभ्यासक्रम राबविण्यासाठी सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांच्या माध्यमातून बरेच नवनवीन अभ्यासक्रम सुरू करता येण्यासारखे आहेत. गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांसाठीच्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेसंदर्भात प्रश्न विचारला असता मंत्री ना. सामंत म्हणाले, की ‘कमवा आणि शिका’ ही योजना कदापि बंद होणार नाही. उलटपक्षी ही योजना सर्वच विद्यापीठांत लागू केली जाईल आणि यात सहभाग नोंदविणार्‍या विद्यार्थ्यांच्या मानधनवाढीसाठीही सरकार प्रयत्नशील राहील. गाडगीळ यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेसंदर्भात आपली भूमिका महत्त्वाची होती, असा प्रश्न केला असता मंत्री ना. सामंत म्हणाले, की मी राजकारणात कोणावरही आरोप करीत नाही आणि पडद्यामागून काहीही गैरप्रकार करणे मला मान्य नाही. जे करायचे ते समोर करायचे. माझा या प्रकरणाशी अजिबात संबंध नाही. गाडगीळ यांनी आपणास उच्च व तंत्रशिक्षण देण्यामागचे गुपित काय? यावर मंत्री ना. सामंत म्हणाले, की राजकारणात जो काही मागतो त्याला काहीही मिळत नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे राजकारणात काहीही मागायचं नसतं, ते आपोआप मिळत असतं आणि ते मिळाल्यावर आपल्याला सिद्ध करून दाखवायचं असतं. गाडगीळ यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांना राजकीय कोपरखळी मारणारा ‘दिल्लीची खेळी’ व ‘जळगावची सीडी’चे रहस्य काय? असा प्रश्न केला असता मंत्री ना. पाटील म्हणाले, की दिल्लीची ‘ईडी’बाबत सर्वांनाच आता माहीत झाले आहे. ‘जळगावच्या सीडी’बाबत ज्यांनी तो विषय उपस्थित केला त्यांनाच याचे उत्तर विचारा. गाडगीळ यांनी याप्रसंगी महापौरांच्या वतीने उपस्थित प्रश्नही मंत्री ना. सामंत यांच्यासह राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांना विचारले. त्यावरही या दोघांनी अतिशय मुद्देसूदपणे उत्तरे दिली. त्यानंतर वेळेची मर्यादा लक्षात घेता मंत्री ना. सामंत यांनी आभार प्रदर्शन कोणीही न करता उलटपक्षी युवा सेनेने हा युवा संवादाचा अतिशय चांगला कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल आयोजकांसह यात सहभागी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे आभार मानले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटमध्ये युवा सेनेचे सदस्यांसाठी प्रयत्नशील : भुसे

गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठात युवा सेनेने सिनेटचे सदस्यत्व निर्विवाद राखण्यात यश मिळविलेले आहे. त्याचा परिपाक म्हणून राज्यातील इतर विद्यापीठातही युवा सेनेचे सिनेट सदस्य पूर्ण ताकदीने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेच. मात्र, माझ्याकडे नाशिक विभागाची जबाबदारी असल्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटमध्येही अथक परिश्रम घेऊन युवा सेनेचा प्रवेश कसा होईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी युवा सेनेचे विभागीय सचिव आविष्कार भुसे यांनी दिली.

मंत्री ना. सामंतांकडून काही घोषणा

– विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी कौन्सिलिंग सेंटर उभारणे राज्य सरकारतर्फे सुरू
– राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालयांना महिन्यातील तीन दिवस विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रम राबविण्यासंदर्भात राज्य सरकार सक्ती करणार
– उद्योग विकसनासंदर्भातील शिक्षण देण्याचा उद्योग मंत्रालय व तंत्रशिक्षण मंत्रालय यांच्या समन्वयातून राज्य सरकार प्रयत्न करणार
– परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीत राज्य सरकार आणखी वाढ करणार

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे