राहीबाईंनी मरणोत्तर पर्यावरणाचा विचार मांडला : ना. अब्दुल सत्तार
राहीबाई चाबुकस्वार यांच्या रक्षाविसर्जनाच्या निमित्ताने धानोरा येथे वृक्षारोपण संपन्न
सिल्लोड : राहीबाई चाबुकस्वार यांच्या दुःखद निधनानंतर रक्षाविसर्जन नदीत न करता 100 वृक्षांचे वृक्षारोपण करून लहाने परिवार व चाबुकस्वार परिवाराने पर्यावरण संवर्धनासाठी समाजासाठी मार्गदर्शक ठरावे असा विचार राहीबाईंनी मरणोत्तर पर्यावरणाचा विचार मांडला असे प्रतिपादन रक्षाविसर्जनच्या निमित्ताने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी मांडले.
धानोरा येथील राहीबाई चाबुकस्वार यांच्या निधनानंतर त्यांचा नदीत किंवा तिर्थक्षेत्रावर रक्षा विसर्जन नकरता या सदरील रक्षेतून शोकाकुल चाबुकस्वार व कृष्णा लहाने यांनी 100 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला. सोमवार (दि.18) रोजी धानोरा ता. सिल्लोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मृत व्यतीची रक्षा नदीत विसर्जित केली, तर त्यामुळे जलप्रदूषण होते. पण या उपक्रमामुळे घरासमोर लावलेली झाडे आणि त्यात असलेल्या आपल्या व्यक्तीच्या आठवणी सतत मायेची सावली देतील. अशी प्रथा देशभर राबवली, तर पर्यावरणाला खूप लाभ होईल.अंत्यसंस्कारानंतर रक्षा नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे. या प्रथेला फाटा देत शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने,कोषाध्यक्ष गणपतराव चाबुकस्वार, महानगरपालिकेचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी राहीबाई चाबुकस्वार यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या रक्षा वृक्षारोपण करत लावलेल्या झाडाजवळ विसर्जित केल्या.घरात दु:खमय वातावरण असताना देखील हा सकारात्मक विचार समाजाला आदर्श देणारा ठरला आहे.लहाने व चाबुकस्वार परिवाराच्या या निर्णयामुळे नदीचे होणारे प्रदूषण टाळण्याच्या कार्यात हातभार लागला आहे.
कार्यक्रमास महसूल व ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सेवानिवृत प्राचार्य नामदेवराव चापे, उपविभागीय पोलीस अधिकारी मराठे साहेब, पोलीस निरीक्षक रेगे साहेब,महावितरण चे अभियंता एकनाथराव वाघ,शिवशारदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पुंडलीकराव बावस्कर,गणेशगिरी महाराज अण्वा, संतोष भारती महाराज सारोळा,डॉ. अक्षय खंडेलवाल,डॉ. रोकडे,डॉ. वरपे, सुनील पालोदकर,डॉ. अभिषेक चाबुकस्वार,डॉ. नितीन चाबुकस्वार,पोलीस उपनिरीक्षक आढे साहेब,गटविकास अधिकारी अशोक दांडगे, नायब तहसीलदार गवळी नामदेव महाराज वाकी, ओमकारगिरीजी महाराज मुर्डेश्वर, डॉ. गजानन काकडे जगन काकडे,हरिश्चंद्र काकडे, नाना येवले,यांच्यासह ग्रामस्थ ,नातेवाईक, आप्तेष्ट, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, सूत्रसंचालन मुख्याध्यापक रायभान जाधव यांनी केले.वृक्षारोपण कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजनासाठी शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
आजीच्या ऋणातून व्यक्त होणे यासाठी कृष्णा लहाने यांचा हा उपक्रम – ना. अब्दुल सत्तार
लहानपणी कृष्णा लहाने यांच्या आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आजी राहीबाई यांनी कृष्णा लहाने यांच्यावर धार्मिक,सामाजिक संस्कारांची पेरणी करत त्यांचा सांभाळ केला. यातून कृष्णा लहाने यांच्या हातून अपंग, अनाथ, मूकबधिर, विकलांग लेकरांची सेवा मागील 15 वर्षांपासून होत आहे. याचबरोबर ते नेहमी समाजकार्यात,धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. ध्रुवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त दरबार मेरे साई का, वृद्धांना चष्मे वाटप, मातृ पितृ कृतज्ञता सोहळ्यानिमित्त गरजूंना कपडे, धान्य वाटप करणे,सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करणे, राज्यस्तरीय कीर्तन समारंभ आयोजित करणे आणि आता आजी राहीबाई यांच्या रक्षाविसर्जनाच्या निमित्ताने रक्षा नदीत विसर्जित न करता 100 वृक्षांचे वृक्षारोपण करणे ,आजीच्या ऋणातून व्यक्त होण्यासाठी रक्षाविसर्जनाला वृक्षारोपण ही संकल्पना समाजाला निश्चित मार्गदर्शन ठरेल असा आवर्जून उल्लेख महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला.