खड्डेमय रस्त्यांमुळे झालेल्या अपघातास सा.बा.विभागाचे अधिकारी जबाबदार ; माजी जि.प.सदस्यांचे उपोषण
चोपडा (विश्वास वाडे) खड्डेमय रस्त्यांमुळे झालेल्या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देवून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब पाटील यांनी आज वर्डी येथून पायी दिंडी काढून तहसील कार्यालय आवार येथे उपोषण सुरू केले आहे.
चोपडा तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्ते खड्डेमय झाले असून त्यांची अत्यंत वाईट दुर्दशा झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत काहींना प्राण गमवावे लागले तर काही कायमस्वरूपी अपंंगत्व आले आहेत. आठवड्याभरात जनसेवा हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या फॅमिली कारला खड्डा टाळत असतांना अपघात झाला होता तर विवेकानंद हॉस्पिटलचे युवा कंपाउंडर याचे वर्डी ते मंगरूळ फाट्याजवळ अपघात होऊन निधन झाले. या घटनांना ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देवून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब पाटील यांनी आज वर्डी येथून पायी दिंडी काढून तहसील कार्यालय आवार येथे उपोषण सुरू केले आहे. या निवेदनाची प्रत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनाही देण्यात आली आहे असे उपोषण कर्त्यांनी सांगितले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील अंकलेश्वर-बुऱ्हाणपुर हा मार्ग, चोपडा-धरणगाव, गलंगी-चोपडा या अतिशय रहदारीच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असल्यामुळे निरपराध लोकांचा मृत्यू होत आहे. वाहन चालकांची वाहनेही खराब होत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि रस्त्यांचे काम करणारे ठेकेदार असून निकृष्ट दर्जाची खडी आणि डांबर वापरल्यामुळे रस्ते लवकर खराब झालेले आहेत. या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीचे प्रयोजन असतानाही सदर ठेकेदार रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नाहीत. म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असून यावेळी चंद्रहासभाई गुजराथी, पं.स.चे माजी सभापती ऍड.डी.पी.पाटील, प्रा.भरत पाटील, डी.पी. साळुंखे, गोपाल सोनवणे, शहर अध्यक्ष शामसिंग परदेशी, प्रफुल्ल स्वामी,नौमान काझी, राजेंद्र भाटिया, लहुश धनगर, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिक यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.