पोलीस प्रशासनाला सहकार्य करा : वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील
कराड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न
पुणे (प्रतिनिधी) महामानवाला सर्वांनी अभिवादन करा. अभिवादन करताना विनाकारण गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच शासनाने कोविडचे घालून दिलेले नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कसा साजरा करावा, यासंदर्भात कराड शहर पोलीस ठाण्याच्यावतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कराड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, शांतता समितीचे सदस्य तथा आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष संतोष थोरवडे यांची उपस्थिती होती.
यावेळी पाटील म्हणाले, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अनुयायांनी-नागरिकांनी अभिवादन केलेच पाहिजे. अशा कार्यक्रमांमध्ये एखादा समाजकंटकही या सार्वजनिक कार्यक्रमाचा दुरुपयोग करून वैयक्तिक वाद हा सार्वजनिक करून लोकांची माथी भडकवण्याचेही प्रकार घडून त्यातून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी त्याच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पातळीवरील विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध सामाजिक मंडळांचे अध्यक्ष कार्यकर्ते, तसेच त्याच्या भागातील पोलीस पाटील यांनी सतर्क राहून शांततेच्या वातावरणात हे कार्यक्रम कसे पार पडतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये सोशल मीडिया वरती फिरणाऱ्या मेसेजकडे त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी पोलिस पाटलांनी लक्ष दिले पाहिजे. आक्षेपार्ह वाटल्यास पोलीस प्रशासनाला याची माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहनही पाटील यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली, शांतता समितीच्या बैठकीत कराड शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध गावातील पोलीस पाटील बहूसंख्येने उपस्थित होते