‘त्या’ घटनेला सोळा दिवस उलटूनही आमदारांना मिळेना सांत्वनासाठी वेळ
ढाणकी (निलेश जाधव) रविवारी महिला आणि तिच्या पोटातील बाळाचा रस्त्यातील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूने संपूर्ण राज्याला खडबडून जागे केले. रस्त्याची समस्या किती गंभीर रूप धारण करू शकते हे या घटनेने संपूर्ण राज्याला दाखवून दिले.
रस्त्याच्या दूरदशे मुळे व वेळेत उपचार न मिळाल्याने तालुक्यातील मन्याळी हे गाव माहेर असलेल्या हिंगोली गावाच्या रहिवासी नताशा अविनाश ठोके या महिलेचा ढाणकी बिटरगाव दरम्यान रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्या दुसऱ्या बाळंत पणासाठी माहेरी मन्याली आल्या होत्या. त्या घटनेला आज बारा दिवस होऊनही स्थानिक आमदार नामदेव ससाने यांनी नताशाच्या कुटुंबीयांची अद्यापही भेट घेतली नाही व त्यांचे सांत्वन केले नाही. त्यामुळे मन्याळी तसेच बिटरगाव परिसरातील नागरिकांनी आमदारांवर रोष व्यक्त केला आहे. एवढी मोठी घटना घडूनही आमदारांना साधी भेटही घेण्यासाठी वेळ मिळत नसल्याने नागरिक दुखावले गेले आहे.
ढाणकी बिटरगाव रस्त्याचे घोंगडे अनेक वर्षापासून भिजत आहे. गेल्या दोन वर्षा पासून यासाठी बंदी भागातील नागरिक संघर्ष करत आहेत. आमदारांनी वेळोवेळी बंदी भागातल्या लग्नसमारंभासाठी तसेच कार्यक्रमासाठी दौरे काढले असताना इतक्या वर्षात त्यांना हा रस्ता दिसला कसा नाही? आणि दिसला तर दुरुस्त का करावा वाटला नाही? हा मोठा प्रश्न आहे. एका आमदारांसाठी चार ते पाच किलोमीटरचा रस्ता करणे काही मोठी गोष्ट नाही. सहज ते कोणत्याही योजनेतून करू शकतात. मात्र इच्छाशक्तीअभावी हे काम रखडले असेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या या रस्त्याबाबत फक्त जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे काम चालू असून बांधकाम विभाग आमदारांवर तर आमदार बांधकाम विभागावर जबाबदारी ढकलत आहेत. यांच्या या खेळामध्ये नताशा सारखे आणखी किती बळी जाणार हे देवच जाणो.
आज नताशा ठोके यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असूनही स्थानिक आमदारांनी साधी भेट न घेतल्याने नागरिक आमदारावर नाराज आहेत.