सोयगाव तालुक्यातील शासकीय कार्यालयांचे रुपडं पालटणार ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश
उपविभागीय, मंडळ अधिकारी कार्यालय अन् फर्दापूरच्या विश्रामगृहसाठी नऊ कोटींचा निधी मंजूर
सोयगाव (विवेक महाजन) औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील शासकीय कार्यालयांच्या इमारतींचे नूतनीकरणासाठी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यात अनेक इमारतींच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आता फर्दापूर येथील उपविभागीय कार्यालय फर्दापूर येथील व्हीआयपी विश्रामगृह, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील १५ मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसाठी सुमारे नऊ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राज्यमंत्री सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
अनेक दिवसापासून होता मानस
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या सोयगाव तालुक्यात आहेत. या लेण्या पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येतात. तसेच अनेक महत्त्वाचे व्यक्ती या ठिकाणी येतात त्यांना थांबण्यासाठी चांगल्या सोयींनी युक्त असे एक चांगले विश्राम गृह असावे असा राज्यमंत्री सत्तार यांचा अनेक दिवसांपासून मानस होता. अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार असलेल्या फर्दापूर येथे हे व्हीआयपी विश्रामगृह बांधण्यासाठी राज्यमंत्री सत्तार अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. व्हीआयपी विश्रामगृहाच्या निर्माणासाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींची ची सोय होणार आहे.
मंडळ अधिकाऱ्यांना मिळणार हक्काचे कार्यालय
सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील काही मंडळ अधिकाऱ्यांना ठिकाणी कार्यालय नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नामुळे सिल्लोड तालुक्यातील 11 आणि सोयगाव तालुक्यातील 4 मंडळ अधिकारी कार्यालय बांधण्यासाठी सुमारे साडेचार कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
फर्दापूरला होणार उपविभागीय कार्यालय
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे उपविभागीय कार्यालयाच्या निर्माणासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे फर्दापूर येथे लवकरच नवीन उपविभागीय कार्यालयाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.
निधी मंजूर झाल्याने माझ्या प्रयत्नांना फळ मिळाले – अब्दुल सत्तार
ग्रामीण भागातून येणारे जनतेला नाहक त्रास होऊ नये. सर्व शासकीय अधिकारी वेळेत आणि जागेवर भेटावे. यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होतो. या कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याने माझ्या प्रयत्नांना फळ मिळाले आहे. असं महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.



