राज्यात उष्माघात घेतोय बळी, याला जबाबदार कोण ?
मुंबई : उष्माघाताच्या बळींची गेल्या आठ वर्षांतील उच्चांकी नोंद झाली आहे. राज्यात गेल्या दोन महिन्यांत तब्बल 25 जणांचा बळी गेला असून नागपुरात उष्णाघातामुळं सर्वाधिक बळी गेले आहेत. उष्णाघातामुळे नागपूरमध्ये तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
यंदाच्या वर्षात वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटांनी राज्यातील लोकांच्या अंगाची लाहीलाही केली आहे. एकामागोमाग येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात 25 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाला आहे. तर 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजेच, सुमारे 44 टक्के मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळं विदर्भात तापमान 45 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. परिणामी विदर्भात उन्हाच्या तडाख्यानं नागरिक हैराण झाले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा जास्तच कडाक्याचा होता. त्यामुळे यंदा उष्माघाताची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
दरम्यान, उष्माघातामुळे बळी जात आहेत, याला जबाबदार कोण ?, तर याला सर्वस्वी जबाबदार आपली जीवनशैली, बेसुमार वृक्षतोड आणि कार्बन उत्सर्जन. आताच जर आपण योग्य पाऊले उचली नाही तर भविष्यात उष्माघाताने बळी जाणाऱ्यांची संख्या अधिकच असेल.