औरंगाबाद येथे उभारणार पेन्शनर्स भवन
मराठवाडा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी यांचा सन्मान
सिल्लोड : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे सेवानिवृत्त नागरिकांसाठी सुसज्ज असे पेन्शनर्स भवन उभारण्यात येईल अशी घोषणा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथे आयोजित मराठवाडा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित सन्मान सोहळयाप्रसंगी केली. पेन्शनर्सला वेळेवर वेतन मिळावे यासाठी उपाययोजना करून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधीत यंत्रणेला याबाबत निर्देश देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
मराठवाडा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने शनिवार (दि.7) रोजी औरंगाबाद येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात वार्षिक सभा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते मराठवाडा भूषण सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच संघटनेच्या स्मरणीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मराठवाडा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, जिल्हा सचिव नामदेवराव घुगे, द.मा. रेड्डी, ऍड. गोरकर, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे प्रदिप विखे, पी.डी. चव्हाण यांच्यासह औरंगाबाद जिल्हा व मराठवाडा येथील सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनाला रोखण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या. त्यांना देण्यात आलेला मराठवाडा गौरव पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाची पावती असल्याचे गौरवोद्गार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. आमदार विक्रम काळे कर्तव्यदक्ष आमदार असून त्यांनी सभागृहात अनेक प्रश्न मांडून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांनी आमदार निधीतून मराठवाड्यातील अनेक शाळेना पुस्तके वाटप केली. याचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे लाभ होईल असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी आमदार विक्रम काळे यांनी पेन्शनर्स भवन साठी जिल्हाधिकारी यांनी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. तर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच पेन्शनर्स संघटनेचे आभार व्यक्त केले.