पालघरमध्ये मद्यधुंद चालकामुळे एसटी बस २० फूट दरीत कोसळली ; १५ प्रवाशी गंभीर जखमी
मुंबई : पालघर येथील वाघोबा खिंडीच्या परिसरात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. भुसावळ ते बोईसर ही एसटी बस येथील २० फुट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत एसटीतील १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रातराणी बस सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या बसचा चालक नाशिक येथे बदलण्यात आला. या चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून भरधाव गाडी चालवणाच्या नादात पालघरच्या आधी वागोबा घाटात बस सकाळी सहाच्या सुमारास दरीमध्ये उलटली. आम्ही कंडक्टरला सांगत होतो की चालक मद्यधुंद अवस्थेत आहे. त्याच्या हातामध्ये गाडीचं स्टेअरिंग देऊ नये. तरी कंडक्टरने आमचं न ऐकता चालकाची पाठराखण केली. मात्र चालक फार भयंकर पद्धतीने अगदी वेगात गाडी चालवत होता. त्यामुळेच हा अपघात झाला, असा दावा या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांनी केलाय. या अपघातामध्ये किमान १५ प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहे.