हार्दिक पटेल कमळ हाती घेणार ; ‘या’ तारखेला होणार पक्षप्रवेश
अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आता भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. हार्दिक पटेल यांचा 2 जून रोजी भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची माहिती आहे.
‘कॉंग्रेसचा हात’ सोडल्यानंतर हार्दिक पटेल कोणत्याही क्षणी भाजपात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. सोमवारी याबाबत त्यांनी विधानही केलं होतं. “मी सोमवारी भाजपात प्रवेश करणार नाही, असं काही असेल तर तुम्हाला कळवू.” असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं. मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. हार्दिक पटेल येत्या 2 जूनला भाजपमध्ये प्रवेश करणार असं वृत्त एका वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
दरम्यान, पक्षातून राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने हार्दिक यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या आरोपानुसार पटेल मागील 6 वर्षांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी हार्दिकच्या राजीनाम्यामागे भाजपचा हात असल्याचा देखील आरोप केला आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर आता हार्दिक पटेल 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.
हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र अंतर्गत कलहामुळे त्यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला. राजीनामा देत असताना त्यांनी कॉग्रेसच्या कार्यश्रेणीवर बोटही उठवलं होतं. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या 2 जून रोजी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हार्दीक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश करणं हा भाजपचा मोठा विजय मानला जात आहेत.