एसटीचे अधिकारी पोहोचले गावागावात
नंदुरबार (प्रतिनिधी) गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबल्याने प्रवाशांची जीवन वाहिनी लालपरी अर्थात एसटी बस थांबल्याने सर्वच दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे. वरिष्ठ स्तरावरील तोडगा निघेल तेव्हा निघेल. मात्र सध्या कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी एसटीचे अधिकारी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या भेटिवर भर देत आहेत.
ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आदींच्या माध्यमातून समन्वय साधून एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर या चार हजारातील १५००० चालक, वाहक, यांत्रिकी व लिपिक वर्गीय कर्मचारी राज्यातील संपात सहभागी झाले आहेत. दोन महिने १८ दिवस संपावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी पूर्ववत कामावर येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे अधिकारी प्रत्येक गावात जाऊन सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि एसटीचे कर्मचारी यांच्यात समन्वय साधून एसटीची चाके पुन्हा धावण्यास मदत होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नंदुरबार आगारप्रमुख मनोज पवार यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या समन्वय अभियानात आगार प्रमुख मनोज पवार यांच्यासोबत लेखाधिकारी सांगळे, सुरक्षा दक्षता अधिकारी विसपुते, वाहतूक निरीक्षक आर्.जे. वळवी पायाला भिंगरी बांधलयाप्रमाणे फिरत आहेत. गेल्या दोन दिवसात नंदुरबार तालुक्यातील आष्टे, नांदरखेडा, ठाणेपाडा, धानोरा, वाघाळे, वैंदाणे, खर्दे, लोय पिंपळोद, शेजवा, घोटाणे, नटावद, शनिमांडळ, तसेच नवापुर तालुक्यातील खांडबारा आदी गावातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून एसटीतील चालक, वाहक यांना कामावर येण्या संदर्भात समन्वय साधण्यात येत आहे. प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेले निलंबन आणि बडतर्फीची कारवाई मागे घेण्याची भावना देखील कर्मचारी वर्गाकडून व्यक्त होत आहे. लवकरच एसटी बसेस पूर्ववत सुरू होणार असल्याचा आशावाद मनोज पवार यांनी व्यक्त केला.