चिनावल येथे खा. रक्षाताई खडसे, महामंडलेश्वर जनार्दन महाराज व आ. शिरीष चौधरी यांच्यासह शेतकऱ्यांचा रस्तारोको
रावेर (सचिन झनके) चिनावल परिसरात मागील बऱ्याच दिवसापासून शेतात चोऱ्यांचे तसेच शेत साहित्य व पिकाच्या नुकसानीच्या घटना घटत आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर मागील सात दिवसांपासून परिसरात दंगा नियंत्रण पथक असतांनाही चिनावल शिवारातील चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याने आज संतप्त शेकडो शेतकर्यांनी *सावदा येथे रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला आहे. सदर रास्तारोको आंदोलनास खासदार रक्षाताई खडसे, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आणि आमदार शिरीष चौधरी यांनी भेट दिली असता शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडतांना अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, आमदार श्री.शिरीष चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चा सचिव भरत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे, भुसावळ शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, रमाकांत दुबे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिनावल शिवारात्त दोन शेतकऱ्यांच्या ठिबक आणि नळ्या जाळून टाकण्यात आल्या तर एका शेतात केळीचे खोडे कापुन जवळजवळ ४ लाखाचे निक्सन करण्यात आले. आपल्या शेतांमधील चोर्यांना पोलिसांचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणी कठोर कार्यवाहीची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर पोलीस अधीक्षक जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत रास्तारोको चालू राहील अशी शेतकऱ्यांची मागणी होती.
तसेच चोरी झालेल्या सदर शेतमालाची बिनारोकठोक रेल्वेद्वारे वाहतूक केली जाते, म्हणुन भुसावळ विभागाचे अप्पर डीआरएम रुख्मैय्या मीना यांना आंदोलन स्थळी बोलविण्यात येऊन कठोर कार्यवाही करणे बाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी सुचना केल्या. तसेच चिनावल परिसरातील चोरट्यांवर पोलीस विभागमार्फत कारवाई न झाल्यामुळे ते शिरजोर झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारींवरून गुन्हे दाखल करावेत, आणि या कामात कुचराई करणार्या एपीआय यांची तत्काळ बदली करावी अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी यावेळी केली.