शिंदखेडा तालुक्यातील विखरण देवाचे द्वारकाधिश संस्थेची पायी दिंडी यात्रेस पंढरपूरला प्रस्थान
शिंदखेडा (यादवराव सावंत) धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील श्री द्वारकाधीश संस्थान विखरण(देवाचे) श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी- २०२२ प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे यंदाही विखरण (देवाचे) येथील श्री क्षेत्र पंढरपूरची पायी वारी जेष्ठ शु.१२ रविवार दि. १२/०६/२०२२ रोजी प्रस्थान झाली. तालुक्यातील व परिसरातील भक्त भाविकांनी भक्तिमय वातावरणात टाळ मृदंग निनानाद पायी दिंडी यात्रेस सहभागी होवून अनेकांनी शुभेच्छा दिल्यात.
विखरण(देवाचे) येथील दिंडी ही धुळे जिल्ह्यातील आद्य (प्रथम) दिंडी म्हणून ओळखली जाते. इ. स. १८८५ च्या सुमारास देव विखरण येथे निघाले. ब्रह्मीभूत श्रीमदसद्गुरु श्री विठ्ठल स्वामी महाराज यांना वारकरी संप्रदायाचा प्रचार धुळे जिल्ह्यात म्हणजेच त्यावेळच्या पश्चिम खान्देश या भागात करावयाचा होता म्हणून त्यांनी विखरण, पिंगाणे, नंदुरबार व तळोदा येथे मंदिरांची स्थापना केली. दैववशात काही ठिकाणी श्री भगवंताचे विग्रह त्यांच्या भक्तिभावाने जमिनीतून प्रगट झाले. त्यातील विखरण हे मुळपीठ. श्री विठ्ठल स्वामी हे वैष्णवाग्रणी, निष्ठावंत वारकरी व पंढरीनाथ पांडुरंगरायाचे निस्सीम उपासक तसेच वैदिक धर्माचे पालन करणारे असून संन्यासी होते. त्यांनी सुरू केलेली ही वारीची परंपरा दिवसेंदिवस विस्तार पावत आहे.
धुळे जिल्ह्यातील बहुतांश दिंड्यांचे उगमस्थान म्हणूनही विखरण येथील पायी दिंडी ओळखली जाते. या दिंडीने आजपर्यंत अनेक नररत्न निर्माण केले आहेत. तसेच वै. ह.भ.प. नथ्थुसिंग बाबा हे सुद्धा प्रथम विखरण येथील दिंडीसोबत पायी पंढरपूर गेले व संत पदाला प्राप्त झाले. अशीही दिंडी परंपरा श्री विठ्ठल स्वामींनी सुरू केल्यानंतर श्री श्रीनिवास महाराज, श्री जयकृष्ण महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री शंकर महाराज यांनी समर्थपणे चालवली ती आजतागायत सुरू आहे. दिडवर्षांपूर्वी वै. शंकर महाराजांचे देहावसान झाले तरीही दिंडी मागच्या कोरोना काळातही श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी वारकऱ्यासह पायीदिंडी गेली होती. हल्ली अशोक महाराज (टिल्लू ) हे दिंडीचे नियोजन पाहतात. इ.स. १९४८-४९ हे रझाकरांचे वर्ष तसेच २०२०-२१ हे कोरोनाचे वर्ष इतक्या कठीण काळातही विखरण संस्थानचा पायी दिंडीचा नियम ईश्वराने अबाधित ठेवला.
दिंडी श्री क्षेत्र विखरण येथून निघून चौगाव, भडणे, चिमठाणे, सोनगीर, धुळे,चाळीसगाव, कन्नड, वेरूळ, पैठण, करमाळा व्हाया करकंब या मार्गाने सुमारे ५००कि.मी. चा प्रवास २७ दिवसात करून श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ शु.९ दि. ८-७-२०२२ रोजी पोहोचेल. दिंडी प्रवासात रोज काकडा, हरिपाठ, दिवसा प्रवचन आणि रात्री कीर्तन ई. कार्यक्रम होत असतात.
या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी कष्टकरी या वर्गाबरोबरच सुशिक्षित लोकांचाही सहभाग असतो. विखरण येथील दिंडीमध्ये धुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर नंदूरबार, शहादा, जळगाव, मुक्ताईनगर, औरंगाबाद, जामखेड, अ.नगर तसेच पैठण, शेवगाव येथील वारकरी, गायक, वादक कलाकार सहभागी होतात.
साधारणतः टिल्लू घराण्याकडे ही वारीची परंपरा १०० वर्षांपासून आहे. सुमारे १९२४ सालापासून टिल्लू घराणे स्वामींची पंढरपूर पायी वारी घेऊन जात आहे. यंदाची ही टिल्लू घराण्यातील वर्षांची ९९वी वारी असून पुढील वर्षी टिल्लू घराण्याचे सेवेचे १००वर्षे पूर्ण होत आहेत आणि पुढेही श्री विठ्ठल स्वामी कृपेने ही सेवा अखंड सुरू राहो,अशी प्रतिक्रिया ह.भ.प. अशोक महाराज श्री द्वारकाधीश संस्थान विखरण (देवाचे) यांनी यावेळी दिली.खासकरुन शिंदखेडा येथील वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ सेवेकरी डॉ विश्वाराव भामरे, दिपक देशमुख, अर्जुन माळी, मोतिलाल पवार, बळीराम माळी, रमेश परदेशी, दिलीप परदेशी, निंबा माळी, हिलाल माळी, चंद्रसिंग गिरासे, भडणे येथील पांडुरंग माळी,चौगांव येथील आनंदा पाटील, दिनकर खरकार, उमेश नगरदेवळेकरसह बालगोपाल वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षक सहभागी झाले होते.