धुळे जिल्हा परिषद अंतर्गत नियोजन करण्यात आलेल्या ठरावांना स्थगिती व विभागीय आयुक्त यांच्या मार्फत गैरकारभारांची चौकशी करण्याचे आदेश !
धुळे : भाजपाने बहुमताच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना निधी न देऊन त्यांना वेठीस धरले होते. ही खेळी भाजपाला चांगलीच महागात पडली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली.
त्यानुसार जिल्हा परिषदेतील दोन वर्षांतील कोट्यवधींच्या निधीच्या ठरावांना स्थगिती देण्यात आली आहे. भाजपाकडून सातत्याने राष्ट्रवादीला डावलण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील व त्यांच्या पत्नी मीनल पाटील यांच्या कापडणे, मुकटी गटात विकास निधी न देणे, तसेच महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामांच्या निधीतून वगळणे सत्ताधारी भाजपाला महागात पडले आहे. याविषयी सदस्य पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत त्यांनी येथील जिल्हा परिषदेतील २०२० ते २०२२ या कालावधीतील सर्व मंजूर ठरावांना स्थगिती दिली आहे.