शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह ; सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला
मुंबई : शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरण आज शुक्रवारी कायम राहिल्याचे चित्र आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण झाली आहे. शेअर बाजार आजही अस्थिर राहण्याचे संकेत दिसून येत आहेत. आज बाजार सुरू झाला तेव्हा बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 313.80 अंकांनी म्हणजे जवळपास 0.61 टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्स 51,181 अंकांवर व्यवहार करत आहे. तर, एनएसई निर्देशांक निफ्टी 87.95 अंक म्हणजे 0.57 टक्क्यांच्या घसरणीसह 15,272.65 खुला झाला.
आज शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात होताच निफ्टी 15 मिनिटात 100 अंकांनी घसरला. निफ्टीमध्ये 106.45 अंकांची घसरण होऊन 15,254 अंकांवर आला आहे. निफ्टी 50 मधील आठ शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून येत आहे. तरस, 42 शेअर्समध्ये विक्री सुरू असल्याने घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीमध्ये 218.95 अंकांची घसरण दिसून येत असून निर्देशांक 32,398 अंकांवर व्यवहार करत आहे.
मेटल क्षेत्र वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये विक्रीचा जोर आहे. फार्मा क्षेत्रात दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, आयटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात 1.96 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. ग्राहकोपयोगी वस्तू आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर दरात 1.5 टक्क्यांच्या आसपास घसरण झाली आहे. मीडिया, रिअल्टी, पीएसयू बँक, ऑटो आणि वित्तीय सेवांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे.



