सहकार भारतीमुळे सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था : विश्वास ठाकूर
नंदुरबार : संस्कृती आणि संघटन शक्तीमुळे सहकार भारतीने देशात अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे. केंद्र शासनाने सहकार खात्याला स्वतंत्र मंत्रालय दर्जा प्राप्त केल्यामुळे आणि अमित शहा यांच्या प्रयत्नाने सहकार क्षेत्राला उज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन विश्वास नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केले.
नाशिक रोड येथील माहेश्वरी भवन येथे सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे दोन दिवशीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे शनिवारी दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे होत्या.
तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महामंत्री विवेक जूगादे, संघटन मंत्री संजय पाचपोर, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अजय ब्रम्हेचा, वनबंधूचे अध्यक्ष अशोक तापडिया, लक्ष्मण पात्रा उपस्थित होते. या बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन प्रमुख दिलीप लोहार, सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कालिदास पाठक, जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे, के. डी. गिरासे, शिरपूर येथील संघटन प्रमुख शशिकांत चौधरी, प्रकाश सिसोदिया, दोंडाईचा येथील संग्रामसिंग राजपूत, धुळे जिल्हा अध्यक्ष आशिष अग्रवाल देखील उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात प्रदेशाध्यक्षा शशिताई अहिरे यांनी सांगितले की, मातृशक्ती मागे सर्वच शक्ती असल्याने अनेक आव्हानांना पेलत सहकार भारतीचे कार्य सुरूच राहणार आहे. सहकार भारती च्या माध्यमातून तृतीयपंथी यांसाठी नाशिक येथे स्वतंत्र सदनिका उभारण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. दुपारच्या सत्रात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, संजय पाचपोर, यांचे प्रबोधन झाले. सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले. सहकारगीत सुरेखा पंढरपूरकर यांनी म्हटले. आभार परमानंद गुजराथी यांनी मानले.