बिबट्याची दहशत ; भरवस्तीत प्रवेश करुन म्हशीचे पारडू केले फस्त !
बिबट्यास तात्काळ जेरबंद करावे ; निमगव्हाण वासियांची मागणी
चोपडा (विश्वास वाडे) तालुक्यातील तापी नदीकाठावर वसलेल्या निमगव्हाण या गांवात व परिसरात सद्या बिबट्याचा खुला वावर असल्याचे दिसून येत आहे. आज पहाटे चार वाजेच्या दरम्यान बिबट्याने भरवस्तीत प्रवेश करीत बापू आत्मारात बाविस्कर यांच्या खळ्यात एक म्हशीचे पारडू फस्त केले. त्यामुळे आता गांवकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील दोन ते तीन वर्षापासून निमगव्हाण परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे गांवकर्यांच्या निदर्शनास आले आहे. व त्याबाबत वनविभागास लेखी अर्जाद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र आजतागायत वनविभागाने कुठलीच भक्कम कारवाई केली नाही. त्याचाच परिणाम म्हणुन बिबट्याने थेट गांवात घुसून म्हशीचे पारडू फस्त केले. या घटनेमुळे संपुर्ण गांवकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या गांवात घुसल्यामुळे तो आता कोणावरही हल्ला करु शकतो या भितीचे शेतीचे कामे करण्यास गांवकरी घाबरत आहेत. बिबट्यांची संख्या दोन-तीन असल्याचे बोलले जात आहे. बिबट्याने काही दिवसांअगोदर नदीकाठावर रानडुक्कराची शिकार केली होती असेही गांवकर्यांनी सांगितले.
मागील दोन वर्षापासून निमगव्हाण परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा खुला वावर असल्याचे गांवकर्यांना निदर्शनास आले आहे. वनविभागास वारंवार लेखी अर्जाद्वारे कळविण्यात आले. मात्र तरीसुद्धा वनविभागाकडून साधी पाहणी सुद्धा करण्यात आली नाही. आज म्हशीचे पारडू बिबट्याने फस्त केले उद्या काही मनुष्य जिवीतहानी झाली तर यास जवाबदार कोण? तरी वनविभागाने तात्काळ बिबट्यास जेरबंद करुन गांवाकर्यांना या दहशतीतून मुक्त करावे अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र भाटीया यांनी केली आहे.