एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : एकनाथ शिंदे हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा आज, गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे यांना भाजपचे संपूर्ण समर्थन असेल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसेच भाजपच्या इतर नेत्यांनी आज, गुरुवारी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देणार असून, ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाहीत. मुख्यमंत्रिपदासाठी काम करत नाही. ही तत्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. विचारांची लढाई आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असा भाजपने निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, आम्ही जो निर्णय घेतला तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका घेवून पुढे जात आहे. बाळासाहेबांचा विचार तसेच राज्याचा विकास हा अजेंडा घेवून आम्ही निघालो आहोत. गेले काही दिवस आम्ही सर्व ५० आमदार एकत्र आहोत. राज्याच्या विकास आणि गेल्या अडीच वर्षात जे काही घडलं ते आपल्याला माहित आहे. फडणवीसांनीही याबाबत नुकतंच सांगितलं आहे.