देवस्थान रोकडे हनुमान मंदिराचा आजपासून यात्रोत्सव
आर्वी : धुळे तालुक्यातील देवस्थान श्री रोकडे हनुमान मंदिराच्या यात्रोत्सवास गुढीपाढव्याच्या दुसऱ्या दिवयी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला दि. ३ मार्चला यात्रोत्सव होणार आहे.
ता. जि. धुळे आर्वी गावाजवळ मुंबई आग्रा महामार्गावर स्वयंभू अतिप्राचीन रोकडे हनुमान मंदिर आहे. याठिकाणी राममंदिर व गुरुवर्य श्री माधवदास महाराज यांचे मंदिर, गोशाळा आहे. या ठिकाणी स्वयंभू श्री रोकडे हनुमान मूर्ती प्रगट झालेली आहे. या मंदिराला शासनाचा ‘ब’ श्रेणी तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला यात्रोत्सव होणार आहे. यात्रोत्सवात गुजरात, मध्यप्रदेश, सुरत, राजस्थान नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे येथील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावतात. यात्रा निमित्ताने श्री रोकडे हनुमान मंदिर परिसराला विद्युत रोषणाई केली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी तगतरावाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे. तसेच कुस्त्यांची दंगल होणार आहे. नवस फेडण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात. भाविकांच्या मदतीने येथे गोशाळाचे बांधकाम सुरू आहे. गोशाळेत १०० तर १५० गायी आहेत. यात्रोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.