अल्पसंख्याक विभागातर्फे आ. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने धुळे जिल्ह्यात १ कोटीची विकास कामे मंजूर
धुळे : धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून धुळे तालुक्यात अल्पसंख्यांक विकास विभागाकडून विविध विकास कामे मंजुर करण्यात आली आहेत. त्याकरीता दहा गावांसाठी १ कोटी १० लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.
धुळे तालुक्यातील सर्व समाज घटकांतील विकासाचा समतोल राखता यावा म्हणून प्रत्येक समाजाला प्राधान्य देत आ. कुणाल पाटील हे विकासाची कामे करीत असतात. त्या त्या समाजातील मुलभूत गरजा व सोयी सुविधा लक्षात घेवून विकास कामांचे नियोजन करुन विकास निधी मिळविण्यासाठी आ. पाटील यांचा प्रयत्न असतो. त्याअनुषंगाने धुळे तालुक्यातील १० गावांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून विविध विकास कामे मंजुर केली आहेत. या कामांसाठी १ कोटी १० लक्ष रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. सोनगीर, चिंचवार, फागणे, नेर, शिरुड, रतनपुरा, तरवाडे, शिरधाणे प्र. नेर, कापडणे, लामकानी या गावातील अल्पसंख्याक बहुल भागात विविध विकासाची कामे केली जातील. त्यात मुस्लिम समाज शादी खाना हॉल सामाजिक सभागृह, कब्रस्थानमध्ये मुलभूत सुविधा करणे, कब्रस्थान रस्ता व संरक्षक भिंत इतर सोयी सुविधा तसेच रस्ता काँक्रीटीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. विकासाची व सोयी सुविधांची कामे मंजुर करुन त्यासाठी निधी मिळवून दिल्याबद्दल आ. कुणाल पाटील यांचे येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.