दिनांक:२१ जुलै २०२२ ब्यूरो रिपोर्ट दिल्ली:
आज देशाला नवे राष्ट्रपती मिळणार असून या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपतिपदाच्या खुर्चीवर नेमकं कोण विराजमान होणार हे चित्र आज स्पष्ट होईल.
देशाचे १५ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे आज या निवडणुकीचा निकाल लागणार असून याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली होती. या दोघांपैकी कोण राष्ट्रपती होईल हे आज स्पष्ट होईल.आज सकाळी ११ वाजल्यापासून संसद भवनातील खोली क्रमांक ६३ मध्ये होत असलेली मतमोजणी दरम्यान, राष्ट्रपतिपदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास ६० टक्के जणांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित असल्याचे मानले जात आहे. मुर्मू विजयी झाल्यास त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील. तसंच त्या पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या म्हणून २५ तारखेला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील.