शिंदखेडा तालुक्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतुद ; कामाला लवकरच सुरुवात
शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या दिर्घ प्रयत्नांना यश
शिंदखेडा (यादवराव सावंत) धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब रस्त्यांचा प्रश्न बिकट बनला होता. जनतेची हिच समस्या लक्षात घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला. त्या प्रयत्नांना यश आले असून शिंदखेडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी 2022-23 च्या अर्थसंकल्पात 4 कोटी 16 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
यामध्ये देगांव, वरझडी, मेथी, सोनशेलू, विरदेल, अमळथे, सोनेवाडी, सुलवाडे रस्ता 1.5 कि.मी. व 2.7 कि.मी (भाग अमळथे, नेवाडे, वरपाडे) व लहान पुलाचे बांधकाम करणे. तसेच निमगुळ, पथारे, रामी, मालपुर, सुराय, मेथी, भडणे, शिंदखेडा, वरपाडे रस्ता 4.00 कि.मी. (भाग भडणे फाटा ते रेल्वे स्टेशन) या रस्त्यांचा समावेश आहे. अमळथे, नेवाडे, वरपाडे या रस्त्यासाठी 2 कोटी 85 लाख रुपये तर भडणे फाटा ते रेल्वे स्टेशन या रस्त्यासाठी 1 कोटी 31 लाख रुपये दोन्ही रस्त्यांचे कामांचे मिळुन 4 कोटी 16 लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. सदरील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद झाल्याने तालुक्यातील ग्रामस्थांकडून जिल्हाप्रमुख .हेमंत साळुंके यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.