विशेष पोलिस महानिरिक्षक डाॅ.बी.जी.शेखर पाटील यांची मोठी कार्यवाही – एलसीबी निरिक्षक किरणकुमार बकाले निलंबित.
विशेष प्रतिनिधि-अखिलेशकुमार धिमान
दिनांक-१५ सप्टेंबर २०२२.
जळगांव-
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा वापरल्याचे फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप आमदार मंगेश चव्हाण यांना काल संध्याकाळी प्राप्त झाली होती. एका पोलीस अधिकार्याची एखाद्या समाजाविषयीची भावना व वापरलेली भाषा पाहता अश्या जातीयवादी प्रवृत्तीच्या अधिकार्याचे तत्काळ निलंबन करण्यात येऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी आ.चव्हाण यांनी कालंच संध्याकाळी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे फोनवरून केली होती. मात्र प्राप्त माहितीनुसार सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले याला नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. मात्र ही थातूर मातुर कारवाई करून एकप्रकारे सदर अधिकार्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आ.मंगेश चव्हाण यांचे म्हणने आहे. किरणकुमार बकाले यांना निलंबीत न केल्यास जळगाव येथील पोेलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढु अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी समाजमाध्यामातून दिली आहे.
याप्रकरणी बोलतांना आमदार चव्हाण म्हणाले की, ऑडिओ क्लिप अतिशय आक्षेपार्ह्य असून अशी प्रवृत्ती पोलीस प्रशासनात राहणे म्हणजे जातीयवादाला खतपाणी घालणे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही दोन समाजात सामंजस्य राखणे माझी जबाबदारी आहे. सदर आक्षेपार्ह्य ऑडिओ क्लिप समाजात प्रसारित झाल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजात उमटतील याची जाणीव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी ठेवावी व सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांचे तात्काळ निलंबन बाबत कारवाई करावी तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी पुन्हा मागणी समाजमाध्यमातून मी करतो. अन्यथा येणार्या पोलीस अधिक्षक कार्यालयावर १० हजारांचा मोर्चा काढु, या काळात मराठा समाजात असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधिक्षक जबाबदार राहतील.
याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बकालेंविरुध्द कठोर कारवाई करण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकांना प्रस्ताव पाठविला होता. किरणकुमार बकाले यांना पदावरुन हटविल्यानंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.त्याशिवाय यात खातेअंर्तगतही चौकशी सुरु झालेली आहे. गणेशोत्सव काळातील ही क्लीप असल्याचे सांगितले जात आहे.