अजित पवार गटाचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप, नेमका युक्तिवाद काय?
अजित पवार गटाने निवडणूक आयोगात सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नियुक्तीवरच आक्षेप घेतला. शरद पवार यांची नियुक्ती निवडणूक घेऊन करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे, असा मोठा युक्तिवाद अजित पवार गटाने केला.

नवी दिल्ली | 9 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? या मुद्द्यावर आज दुसऱ्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच प्रश्न उपस्थित केला. शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड ही बेकायदेशीर होती, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. यावेळी अजित पवार गटाने शरद पवार यांच्यावर खूप मोठा आरोप केला. “शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले. एका सहिने नियुक्त्या केल्या जात होत्या. पक्षात यापूर्वीच्या संघटनात्मक नेमणूक कायद्याला धरुन नव्हत्या”, असा दावा अजित पवार गटाने केला.
“शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवड निवडणूक घेऊन झालेली नाही. निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांची नेमणूका करत होता. ते योग्य आहे का? शरद पवार एकदाही निवडून आले नाहीत. मग त्यांची नियुक्ती वैध कसं म्हणता येईल? अजित पवार गटाची नियुक्ती कायदेशीर आहे. तर शरद पवार गटाची निवड बेकायदेशीर आहे”, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकिल मनिंदर सिंह यांनी केला. यावेळी पी. ए. संगमा यांच्या प्रकरणाचादेखील दाखला देण्यात आला.
‘पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीच नाही’
“एकच व्यक्ती पक्षावर दावा करु शकत नाही. पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीच नाही. पक्षांतर्गत नियुक्त्या निवडणुकीनुसार झालेल्या नाही. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत. त्यांच्या सहीने सर्व नियुक्त्या झाल्या आहेत. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे”, असादेखील युक्तिवाद अजित पवार गटाने केला.
“पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. आमच्याकडे विधीमंडळातील बहुमत आहे. दीड लाखापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहेत. त्याचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागेल. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत”, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. “महाराष्ट्रातील 53 पैकी 42 आमदार आमच्याकडे आहेत. तसेच नागालँडचे 7 आमदार आमच्यासोबत आहेत”, असं अजित पवार गटाने केलाय. अजित पवार गटाने शिवसेना प्रकरणाचा दाखला दिलाय. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा दावा अजित पवार गटाने केलाय. अजित पवार गटाने सादिक अली प्रकरणाचादेखील दाखला दिला.
“आम्ही दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करा. सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्र योग्य आहे. त्यांची तपासणी देखील करा. जी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये कोणतीही चूक नाही”, असा दावा अजित पवार गटाचे वकील नीरज कौल यांनी केलाय. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने आतापर्यंत चार वेळा संधी दिली. त्यामुळे अजून वेळ वाढवून देऊ नका, असं अजित पवार गटाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने पक्षातील फुटीवर चर्चा करुन निर्णय घ्यावा, असं अजित पवार गटाच्या वकिलांनी म्हटलंय.