महाराष्ट्र

दोन मंत्र्याच्या मतदार संघातील नवजात शिशु व गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी मिळेना रुग्णवाहिका,

रुग्णवाहिका मिळावी यासाठी करावा लागतो संघर्ष, नागरिकांमधून संताप.

सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन , तालुका विशेष प्रतिनिधी

सोयगाव : तालुक्यातील माळेगाव पिंप्री येथील सौ. निकिता रोहित मोरे वय २५ वर्षे या गर्भवती महिलेला १३ शनिवारी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे खाजगी वाहनाने सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास प्रसूतीसाठी नातेवाईकांनी दाखल केले होते. वैद्यकीय अधिकारी शाम गायकवाड यांनी गर्भवती महिलेची तपासणी करून प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे नातेवाईकांना सांगितले. गर्भवती महिलेच्या पतीने १०२ ला कॉल केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या १०२ रुग्णवाहिका चालकास पत्नीला प्रसूतीसाठी जिल्हारुग्णालयात घेऊन जाण्यासाठी विनंती केली. परंतु रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे सांगितले. १०८ ला कॉल केला असता अर्धातास कॉल प्रतीक्षेत ठेवण्यात आला होता. सोयगाव येथे १०२ व १०८ या दोन्ही रुग्णवाहिका उभ्या असतांना देखील गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जाण्यासाठी १०२ व १०८ कडून प्रतिसाद मिळत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात होता. याचवेळी प्रहारचे संदीप इंगळे यांना रुग्णवाहिका मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी इंगळे यांनी संपर्क केला असता १०२ रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे सांगण्यात आले. डिझेलसाठी दोन हजार रुपये मी देतो असे प्रहारचे संदीप इंगळे यांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांना सांगत धारेवर धरले. तब्बल दीड तासानंतर गर्भवती महिलेला ग्रामीण रूग्णालयाकडून रुग्णवाहिकेत डिझेल टाकून उपलब्ध करून देण्यात आली. प्रसूतीसाठी सदर महिलेला जिल्हा रुग्णालयात जळगाव दाखल करण्यात आले. गर्भवती महिलांना रुग्णवाहिकेची सेवा मोफत असतांना यासंबंधी ग्रामीण रुग्णालयाने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. वैद्यकीय अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी १०२ रुग्णवाहिका मिळावी यासाठी अनेकवेळा संघर्ष करावा लागला आहे.

सोयगाव ग्रामीण रुग्णालय व जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ या दोन रुग्णवाहिका आहे. जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ रुग्णवाहिकेचा तालुक्यात कोविड लसीकरणासाठी वापर केला जात आहे. तर ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका डिझेल नसल्याचे कारण सांगत गोरगरीब सर्वसामान्य जनतेची हेळसांड करीत आहे. १०२ कॉल सेंटरचा समन्वय नसल्याने रुग्णवाहिका गर्भवती महिलांना मिळत नाही. सत्ता भोगत असलेले लोकप्रतिनिधी मस्त तर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुस्त झाले आहे. मात्र हाल सर्वसामान्य जनतेचे होत आहे. ज्या उद्देशाने शासनाने लाखो रुपये खर्च करून नवीन रुग्णवाहिका दिल्या आहे त्याच गर्भवती महिला व नवजात शिशु साठी मोफत असलेली रुग्ण वाहिका वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांमधून शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तर वरिष्ठ पातळीवरून याप्रकरणी काय कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन मंत्र्यांच्या मतदारसंघातील गर्भवती महिलांना रुग्णवाहिका उपलब्ध असतांना सुद्धा ती उपचारासाठी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने नवजात शिशु व गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गर्भवती महिला व नवजात शिशु मोफत संदर्भ सेवा देणाऱ्या शासनाच्या लाखो रुपये खर्च करून १०२ या नवीन रुग्णवाहिका तालुक्यात देण्यात आल्या आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यालयीन अधीक्षकांच्या मनमानी करीत गैरहजर राहण्यामुळे १०२ ही रुग्णवाहिका गर्भवती महिलांना डिझेल अभावी मिळत नसल्याने शोभेची वस्तू बनली आहे. वैद्यकीय अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे सतत गैरहजर राहणारे कार्यालयीन अधीक्षक रवींद्र सूर्यवंशी यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

छायाचित्र :- ग्रामीण रुग्णालयात उभी असलेली १०२ रुग्णवाहिका तर शिवाजीनगर आमखेडा येथे खाजगी जागेत उभी असलेली १०८ रुग्णवाहिका.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे