कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कोल्हापूर (धरणेंद्र मंडपे) दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपल्याने पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. कृष्णा नदीवरील म्हैसाळ व राजापूर हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये बंधारे पाण्याखाली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून वास्तव्य करणे देखील कामगारांना शक्य होत नाही. खोपटामध्ये पाणी शिरले आहे तर ऊसाच्या सऱ्यांमध्येही पाणी साचले असल्याने तोडणी शक्य नाही. ऊसतोडणीला जाणारे मजूर आता राहण्याची व्यवस्था करण्यातच दंग आहेत. दरम्यान, अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. उसाच्या शेतामधील सऱ्यांमध्ये पाणी साचल्याने ऊस तोडणी खोळंबली आहे. अर्धवट तोडणी झालेला ऊस बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागतेय.