सावळदबारा, टिटवी प्रकल्पाच्या रस्त्यासह चारुतांडा येथील पुलाच्या कामास ही मिळाली मंजुरी
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
सिल्लोड ( विवेक महाजन तालुका,प्रतिनिधी )
सिल्लोड : तालुक्यातील भराडी सिंचन प्रकल्पात फेरबदल करून भराडी येथील प्रकल्पा ऐवजी पूर्णा नदीमध्ये बॅरेजेस बांधण्यास तसेच सोयगाव तालुक्यातील सावळदबारा, टिटवी येथील प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ता व चारूतांडा येथील प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यात पूल करण्याच्या प्रस्तावास गुरुवार ( दि.18 ) रोजी जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असल्याची माहिती महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील गोदावरी – तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी अधिकच्या सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मतदारसंघात सर्वेक्षणाचे काम सुरू असून याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी मतदार संघातील सिंचनाच्या मेगा प्रोजेक्टच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली असल्याने या कामाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. याचाच एक म्हणून मुंबई येथे गुरुवार रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत पूर्णा नदीमध्ये जवळपास 6 बॅरेजेस उभारणे, तसेच सोयगाव तालुक्यातील सावळदबारा प्रकल्प क्षेत्राच्या बाजूने रस्ता करणे, टिटवी प्रकल्प क्षेत्रास जाण्यासाठी पर्यायी रस्ता करणे व चारूतांडा प्रकल्पाच्या क्षेत्रातील व गावाजवळील पुलाचे काम करण्याच्या प्रस्तावास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता फक्त सुधारित अंदाजपत्रकास मान्यता घेऊन निविदा कार्यवाही करायची आहे असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
———————————————–
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मतदारसंघातील शेतकरी दोन पिके घेणारा झाला पाहिजे यावर सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण करणे हे प्रभावी साधन आहे. संपूर्ण मतदारसंघ पाणीदार करण्याचा दृष्टीने सविस्तर जल आराखडा तयार करण्यात आला असून त्या पद्धतीने सर्वेक्षणाचे काम नियमितपणे सुरू आहे. काही भागाचे सर्वेक्षण झाले असून उर्वरित सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मतदारसंघात सिंचनाच्या मेगा प्रोजेक्ट कामाला सुरुवात होण्याच्या दृष्टीने शासनास पाठपुरावा सुरू आहे.
*- राज्यमंत्री अब्दुल सत्तार*