भाजपचे मंगेश सोहणी तसेच काँग्रेसचे नगरसेवक लतीफ शहा यांचा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश
सोयगाव ( प्रतिनिधी ) दि.28, सोयगाव भाजपा ओबीसी मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष मंगेश सोहणी तसेच नगर पंचायत मधील काँग्रेस पक्षाचे गटनेते लतीफ शहा यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची कार्यपद्धत व नेतृत्वावर विश्वास ठेवत समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्या हस्ते शिवबंधन बांधून श्री. सोहणी व लतीफ शहा यांना प्रवेश देण्यात आला. रविवार ( दि.28 ) रोजी सिल्लोड शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, कृउबा बाजार समितीचे संचालक दामूअणा गव्हाणे, सतीश ताठे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे यांच्यासह सोयगावचे मोतीराम पंडित, कृष्णा राऊत, राजू दुतोंडे, हाजी शेख बबलू आदींची उपस्थिती होती.



