महाराष्ट्र

सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करणार

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही

सिल्लोड ( विवेक महाजन : प्रतिनिधी ) दि.29, सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वेक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा यासाठी तळमळीने पाठपुरावा सुरू आहे असे स्पष्ट करीत सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी औरंगाबाद येथील आयोजित गौरव सोहळ्या प्रसंगी दिली.

मराठवाडा अभियंता मित्र मंडळाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव अजय कोहिरकर तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक दिलीप तवार यांच्यासह जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. औरंगाबाद येथील एमजीएम परिसरातील रुख्मिनी सभागृहात हा सोहळा पार पडला.

याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोगत व्यक्त करीत असतांना सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील दुर्लक्षित व अत्यल्प सिंचन व्यवस्थेमुळे होत असलेल्या शेतकरी आत्महत्या तसेच नवीन व जुन्या सिंचन व्यवस्थेच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. जलसंपदा विभागाचे सचिव अजय कोहिरकर, तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक दिलीप तवार हे दोघे अधिकारी दोन दिवसानंतर सेवानिवृत्त होत आहे. अनेक वर्षानंतर या दोन अधिकाऱ्यांनी मराठवाड्यासह सिल्लोड – सोयगाव मतदारसंघाला न्याय देण्याचे काम केले. येणारे अधिकारी यांना सर्व परिस्थिती सांगायला वेळ जाईल त्यामुळे मंत्री जयंत पाटील यांनी तातडीने दोन दिवसात सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील प्रलंबित प्रस्तावाला निकाली काढून मान्यता द्यावी अशी विनंती केली. यावर उत्तर देतांना मंत्री जयंत पाटील बोलत होते.
———————————————-
*काळजी करू नका मी अजून मंत्री आहे…..*
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात दोन दिवसांपूर्वीच दोन तीन प्रस्तावाला मान्यता दिली. अजिंठा परिसरात निजाम कालीन सिंचन व्यवस्थेचे पुनर्जीवन करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. हा भाग तापी खोऱ्यात येतो. कार्यकारी अभियंता श्री. तवार यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केलेला आहे. ते सेवा निवृत्त होत आहे. ते जरी सेवा निवृत्त झाले तरी काळजी करू नये मी अजून मंत्री आहे जो कोणी अधिकारी येईल ते सकारात्मक पणे काम करतील अशा शब्दांत मंत्री जयंत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.
———————————————–

*किमान 3 टीएमसी पाणी अडविल्या जाईल यापद्धतीने सिंचन व्यवस्था निर्माण करा*

*- राज्यमंत्री अब्दुल सत्तार*

सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात जवळपास 9 टीएमसी पाणी पडतो. यातील काही पाणी तापी खोऱ्यात तर उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यात वाहून जाते. सिंचनाच्या शाश्वत सुविधा नसल्याने दुर्दैवाने सिल्लोड – सोयगाव तालुके आत्महत्याग्रस्त तालुके आहेत. 9 टीएमसी पैकी पहिल्या टप्प्यात किमान 3 टीएमसी पाणी जरी अडविल्या जाईल या पद्धतीने सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. जेणे करून सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील शेतकरी दोन पिके घेणारा होईल असे स्पष्ट करीत मराठवाड्याला न्याय देण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने एक दिवसीय चर्चा सत्र आयोजित करण्यात यावे अशी मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव व्यंकटराव गायकवाड होते. तर आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे ,रोहोयो मंत्री ना. संदीपान भुमरे, आ. सतीश चव्हाण यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी तात्याराव मुंडे, शंकरराव नागरे, दीपक कंदी, बाबुराव कंदरफळे, राम घोटे आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे