धुळे येथून मुंबईला जाण्यासाठी ‘मेमू’ला बोगी लावावी !
धुळे (स्वप्नील मराठे) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक महिन्यापासून धुळे चाळीसगाव रेल्वे सेवा बंद होती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागत होते. रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून काही दिवसांपूर्वी मेमू रेल्वे सुरू झाली आहे. मात्र धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी अमृतसर एक्स्प्रेसला लावण्यात येणारी बोगी पुन्हा सुरू करावी अशी मागणी रेल्वे समितीचे सदस्य हिरामण गवळी, महापौर प्रदीप कर्पे यांनी रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिल्लीत दिले.
गेल्या काही दिवसांपासून धुळे चाळीसगाव मेमू रेल्वे सुरू करण्यात आली आहे. सध्या धुळे चाळीसगावच्या रेल्वेच्या दोन फेऱ्या होत आहे. मात्र धुळे चाळीगाव प्रवास करणारे विद्यार्थी व्यवसायिक तसेच मंजूरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या तीन रेल्वेच्या फेऱ्या कमी पडत आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात. तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोदावरी एक्सप्रेस मनमाडऐवजी धुळे येथून सुरू करावी. त्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई, मनमाड, नाशिक, पुणे नगर येथे जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
याबाबत रेल्वे प्रशासनाने विचार करावा अशी मागणीचे निवेदन दिल्ली येथे माजी संरक्षण मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. दिल्ली येथे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देतांना रेल्वे समितीचे सदस्य हिरामण गवळी सोबत खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे उपस्थित होते.