डिसान ॲग्रोटेक कंपनीत ४० लाखांचा अपहार ; मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
धुळे (विक्की आहिरे) शहरातील अवधान एमआयडीसीतील डिसान ॲग्रोटेक प्रा. लि कंपनीतील ४० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी दोघा व्यापाऱ्यांसह वजन काटा कर्मचारी अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अशोक मुकूंदा सोनार ( वय ५२ रा. प्लॉट नं. १०, महालक्ष्मी कॉलनी, शिरपूर) यांनी मोहाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सन २०१८ ते २०२० दरम्यान हा प्रकार घडला. या कालावधीत कंपनीचे वजनकाटा कर्मचारी कुणाल ज्ञानेश्वर सपकाळ व केशव चंद्रसिंग पाटील ( रा. डिसान ॲग्रोटेक प्रा. लि अवधान ) यांनी नोकरीवर असतांना कंपनीच्या वजन काट्यावर मालाचे मोजमाप करण्याचे सोपविलेले काम विश्वासाने केले नाही. दोघांनी कंपनीत सोयाबीन माल विक्रीसाठी आणणारे व्यापारी दिलीप काळुसिंग निमरोट व ज्योतिसिंग काळुसिंग निमरोटे ( रा. जनुना ता. बुलढाणा) यांच्याशी संगणमत केले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीत विक्रीसाठी येणाऱ्या ९ वाहनांच्या वेळोवेळी झालेल्या फेऱ्यांपैकी १८ वेळा एकुण १८० फेऱ्यांमध्ये काहीवेळा ४ टन व काळी वेळा ५ टन मालाचे जास्त वजन काटा पावतीवर नोंदवून एकुण १ हजार टन वजनाचे प्रति टन अंदोज ४ हजार रुपयांप्रमाणे एकुण ४० लाख रूपयांचा अपहार करून विश्वासघात करून कंपनीची आर्थिक फसवणूक केली. यावरून चौघांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ४०८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीआय शिंदे करीत आहेत.