४५ हजारांची लाच घेतांना लिपिक ताब्यात
धुळे (विक्की आहिरे) शहरातील जात पडताळणी विभागात काम करणाऱ्या लिपिकाला 45 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागातील पथकाने रंगेहाथ पकडले. विजय वाघ असे या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रहिवासी असलेल्या एकाने सन २०१७ मध्ये जात प्रमाणपत्र घेतले आहे. आता जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित विभागात अर्ज दिला होता. यासोबतच मूळ जात प्रमाणपत्रदेखील दिले होते. परंतु हे जात प्रमाणपत्र हरवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराने जात प्रमाणपत्रांची दुय्यम प्रत द्यावी अशी मागणी केली. त्याच्या मोबदल्यात कनिष्ठ लिपिक विजय रतन वाघ वय ५१, रा. सुशीलनगर यांनी ५० हजारांची मागणी केली. त्यामुळे संबंधित नागरिकाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सापळा लावण्यात आला. त्यानंतर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळील रस्त्यावर तडजोडीअंती ४५ हजारांची लाच घेताना विजय वाघ यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आणण्यात आले.
पथकाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर, निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजित चव्हाण, कर्मचारी राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, कृष्णकांत वाडिले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भुषण शेटे, महेश मोरे, संदीप कदम, गायत्री पाटील, सुधीर मोरे, जगदीश् बडगुजर यांनी कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलचे काम सुरू होते. कारवाईनंतर विजय वाघ यांच्या घराची झडती घेतली. परंतु काहीही मिळून आले नाही.



