वारकरी संप्रदायाचे कार्य समाजासाठी दिशादर्शक : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन
म्हसला येथील अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती
सिल्लोड (विवेक महाजन) आई- वडील व लहान मोठ्यांचा सन्मान करीत समाजाला व्यसनमुक्तीसह आपले कर्तव्य निष्ठेने पार पडण्याची शिकवण देत सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यत्मिक वारसा जपणाऱ्या वारकरी संप्रदायाचे कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हसला खुर्द येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी केले. किर्तनकारांनी कीर्तनाच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार आणि उपदेशाचे नागरिकांनी पालन करणे काळाची गरज असल्याचे मत देखील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केले.
तालुक्यातील म्हसला खुर्द येथे कै. निवृत्ती बाबा वक्ते यांच्या प्रथम पुण्यसमरणार्थ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार (दि.10) रोजी ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली. या सांगता सोहळ्यास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देत मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी आयोजकांच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांचा सत्कार केला.
याप्रसंगी जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, डॉ. संजय जामकर, रघुनाथ गोराडे, सरपंच सुखदेव सपकाळ, लक्ष्मण तायडे, पुंजाराम गरुड, भगवान जंजाळ यांच्यासह म्हसला खुर्द, म्हसला बुद्रुक, टाकली खुर्द व परिसरातील गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आगमन होताच येथे काल्याचे कीर्तन सुरू होते. सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून राज्यमंत्री अब्दुल सत्तार किर्तनस्थळी येवून बसले. जवळपास एक तास त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे कीर्तनात उपस्थित राहिले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा पुन्हा एकदा पहायला मिळाला. एक तासाच्या कीर्तनाच्या वाणीतून बरेच काही शिकायला मिळाले तसेच मन मंत्रमुग्ध झाल्याची भावना देखील त्यांनी बोलतांना व्यक्त केली.