बोरद ते खरवड रस्त्यावर दुतर्फा काटेरी झुडपांची वाढ ; वाहनधारकांना नाहक त्रास
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद ते खरवड रस्त्यावर दुतर्फा काटेरी झुडपांची वाढ झाली असल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड सीमाताई वळवी यांच्या कडे समस्या बोलून दाखवली होती. त्यामुळे खरवडच्या हद्दी पर्यंत झुडपे काढण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांन कडून समाधान व्यक्त केले जात होते. मात्र तसे झाले नाही बोरद हद्दीतील झुडपे काढण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाकडून, ग्रामस्थांनकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
संबधित रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले असून मात्र आता पावसाळा तोंडावर आला असल्याने रस्त्याचे काम हे आता सुरू होईल असे चित्र आता दिसत नाही. संबंधित रस्ता हा प्रकाशा ते वेळावद मंजूर आहे. मात्र आता मे महिना सुरू झाला असून मान्सून काही दिवसांवर येवून ठेपला आहे त्यामुळे हे शक्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदा ही वाहनधारकांना या रस्त्याच्या समस्येपासून सुटका होणार नसल्याचे दिसून येत आहे.
तळोदा तालुक्यातील बोरद हे मोठे गाव असून अनेक सरकारी कार्यालय या ठिकाणी आहेत. त्यात बँक, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, बाजारपेठ ई त्यामुळे हा रस्ता महत्वाचा आहे. रस्त्यावर दुतर्फा काटेरी झुडपांची वाढ झाली असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागाने बोरद पासून १ किमी रस्ता दुरुस्त करावा व उर्वरित काटेरी झुडुपे काढावी अशी मागणी वाहन धारकांकडून करण्यात येत आहे.