गुलाबराव पाटील यांच्या ‘या’ वक्तव्यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर संतापल्या; म्हणाल्या…
मुंबई (प्रतिनिधी) नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुणाळीत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उभा राहिला आहे. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन, असेही ते म्हणाले होते.

राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वक्ताव्यावरुन चांगल्याच संतापल्या. त्या म्हणाल्या, एक लोकप्रतिनिधी म्हणून असे विधान करणे हे निषेधार्ह आहे, त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशाराच चाकणकर यांनी दिला आहे.
आपल्या मतदारंघातील रस्त्याची तुलना त्यांनी एका महिला खासदाराच्या गालासोबत केली, या विधानाबाबत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. तसेच, एका वस्तूची तुलना महिलेच्या रंग रुपासोबत करणे, ही संस्कार आणि संस्कृती अत्यंत नीचपातळीची आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देतात, हे चुकीचे आहे, असही त्या म्हणाल्या.




