थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी शेतकऱ्यांच्या २० मेंढ्यांवर डल्ला?
कोल्हापूर (प्रतिनिधी) शेतात खतासाठी बसवलेल्या मेंढ्यांच्या कळपातून एक लाख रुपये किंमतीच्या वीस मेंढ्या चोरीस गेल्या. या मेंढ्या कोणी चोरून नेल्या याचा पोलिस शोध घेत आहेत. थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मेंढ्यांची चोरी झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे संजय सुरेश पाटील यांच्या मालकीच्या शेतात मेंढ्या खतासाठी बसवलेल्या होत्या. शेतामध्ये उसाची लावण करण्यापूर्वी जमिनीचा कस वाढवण्यासाठी मेंढी खतांसाठी बकरी अथवा मेंढ्या शेतात बसवल्या जातात. एकाच शेतात तीन ते चार दिवस मेंढ्यांचा कळप बसतो. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाटील यांच्या शेतात युवराज महादेव येडके, सुरेश आण्णासो हाके आणि विनोद यंकापगोळ यांच्या मेंढ्या होत्या. गुरुवारी सकाळी नऊ वाजता मेंढ्या मोजल्या असता त्यातील २० मेंढ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे लक्षात आले. येडके यांच्या मालकीच्या सात, हाके यांच्या मालकीच्या तीन तर यंकापगोळ यांच्या मालकीच्या दहा मेंढ्या चोरीस गेल्या आहेत. या मेंढ्या पांढऱ्या आणि तांबूस रंगाच्या असून अंदाजे दोन ते तीन वर्षाच्या आहेत. मेंढ्यांच्या उजव्या व डाव्या कानावर उभे आणि आडवे काप आहेत. मेंढ्याचे मालक युवराज ‘ यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शिरोळ गावातील गारडी गल्लीत दारात बांधलेल्या अंगणात बांधलेल्या दोन शेळ्या चोरीस गेल्याची फिर्याद विकी सकट यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात दिली आहे.
शुक्रवारी ३१ डिसेंबर असल्याने खवय्ये आणि हॉटेल चालकांकडून बकऱ्याच्या मटणाची मोठी मागणी असते. सध्या बाजारात मेंढ्या, बकरी, पालव्यांची चणचण भासत आहे. या पार्श्वभूमीवर मेंढ्यांची चोरी झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे