नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे रेझिंग डे सप्ताहास प्रारंभ
नंदुरबार (प्रतिनिधी) नवीन वर्षाचे औचित्य साधून शहर वाहतूक शाखेतर्फे रविवारपासून रेझिंग डे सप्ताहास प्रारंभ झाला. या सप्ताहात वाहनचालकांचे प्रबोधन आणि कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार यांच्या नेतृत्वखाली दिनांक २ ते ८ जानेवारी दरम्यान शहरातील विविध चौक आणि प्रमुख रस्त्यांवर वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावी यासह सध्याच्या परिस्थितीत मायक्रॉन पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक असून सामाजिक अंतर ठेवून संभाव्य संकट टाळण्याचे आवाहन शहर वाहतुक शाखेतर्फे करण्यात येत आहे.
या सप्ताहांतर्गत रविवारी शहर वाहतूक शाखेच्या पथकाने हाट दरवाजा, उड्डाणपूल, सिंधी कॉलनी, करण चौफुली, धुळे रोड चौफुली, नवापूर चौफुली आदी भागात मोटारसायकलस्वार, रिक्षाचालक, खाजगी वाहन धारक यांच्याशी संवाद साधून प्रबोधन करण्यात येत आहे.या अभियानात वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार यांच्यासह पथकात पोलीस उपनिरीक्षक दिलीप गांगुर्डे, एएसआय युवराज वाणी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर लामगे, देविदास पाटील,धनंजय शिरसाठ, संतोष काळे, वाहन चालक भानुदास वसावे यांचा समावेश आहे.



